भूम (जि.उस्मानाबाद) : चित्रपटांचा परिणाम समाजमनावर कसा ठासून होतोय, याचा प्रत्यय मंगळवारी पोलिसांनी आला. पाथरुड येथील एका १२ वर्षीय शाळकरी मुलाने गुरे चारताना चित्रपट पाहिला अन् त्यातील एका प्रसंगाप्रमाणे थेट हॉटेल उडवून देण्याची धमकी फोनवरुन दिली. चौकशीत ही बाब निष्पन्न झाल्यानंतर त्या मुलास तंबी देऊन बुधवारी सोडण्यात आले.
भूम तालुक्यातील पाथरुड येथील एक १२ वर्षीय मुलगा सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. फावल्या वेळेत ते गुरे चारण्याचीही कामे करतो. असे दोन दिवसांपूर्वी भ्रमनध्वनीवर त्याने २६-११ हा चित्रपट पाहिला. त्यात असलेल्या एका प्रसंगावरुन प्रेरित होत त्याने मुंबईतील ताज हॉटेलचा संपर्क क्रमांक शोधून काढला व थेट त्यावरच फोन करुन गंमतीने हॉटेलवर हल्ला होणार असून, ते स्फोटकांनी उडवून देण्यात येणार असल्याचा संदेश दिला. नुकताच उद्योजक अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली जीप आढळून आलेली असल्याने पोलीस यंत्रणा आधीच सतर्क झाली आहे. त्यातच हा फोन कॉल गेल्याने मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. ज्या नंबरवरुन फोन गेला होता, तो निष्पन्न झाल्यानंतर हा नंबर कोणाचा याचाही शोध घेतला गेला. तो उस्मानाबाद जिल्ह्यातील पाथरुड येथील निघाला. त्यानंतर उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांना संपर्क साधून शोध घेण्याबाबत सूचित करण्यात आले. भूम ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी कर्मचार्यासोबत तातडीने शोध घेऊन त्या शाळकरी मुलास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कॉल केल्याचे कबूल केले. तसेच २६-११ हा चित्रपट पाहिल्यानंतर गंमत म्हणून त्याने हा प्रकार केल्याचे चौकशीत सांगितले. या प्रकाराची पूर्ण खात्री झाल्यानंतर मुंबई पोलिसांशी व्हिडिओ कॉलने संपर्क करुन मुंबई पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली गेली. तसेच त्या मुलाशी बोलणेही करुन देण्यात आले व मुलास त्याच्या पालकांना तंबी देऊन पुन्हा असे न करण्याची ताकिद देत सोडून देण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिसांची मात्र भंबेरी उडून एकच धावपळ उडाली होती.