भूम (उस्मानाबाद) : वाशी तालुक्यातील पारा येथे एका अल्पवयीन मुलावर तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना चार वर्षांपूर्वी घडली होती़ याप्रकरणातील आरोपी तरुणास भूमचे अतिरिक्त सत्र न्या़जे़डी़ वडणे यांनी बुधवारी अंतिम सुनावणीअंती सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे़
पारा येथील एक अल्पवयीन मुलगा हा १ डिसेंबर २०१५ रोजी त्याच्या घरी एकटाच होता़ यावेळी गावातीलच तरुण अविनाश नामदेव दोनगव हा बालकाच्या घरी जावून त्यास मोबाईल गेम शिकविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरी घेऊन गेला़ येथे बालकासोबत जबरदस्ती करीत आरोपीने मारहाण केली़ त्यानंतर धमकावून या बालकावर अनैसर्गिक अत्याचार केला़ ही बाब पीडित मुलाने घरी सांगितल्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात त्याच दिवशी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़
या प्रकरणाचा तपास करुन पूर्ण करुन पोलीस निरीक्षक जी़डी़ जाधव, बाजीराव बळे यांनी भूमच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ सुनावण्यांत पीडित मुलाची साक्ष, वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे सादर करुन अतिरिक्त सरकारी अभियोक्ता किरण कोळपे यांनी आरोपीस कठोर शिक्षा करण्याबाबत युक्तीवाद केला़ सरकारी पक्षाकडील पुरावे, युक्तीवाद ग्राह्य धरुन न्या़जे़डी़ वडणे यांनी आरोपी अविनाश दोनगव यास सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे़