'पाया पडण्यावरुन पवारांचा पाटलांना टोला, स्वत:ला सिंह म्हणणारे सुद्धा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 09:45 AM2019-09-18T09:45:55+5:302019-09-18T09:46:05+5:30
उस्मानाबादमध्ये जायचंय तर जा, पण एखाद्याच्या पाया पडण्याइतका स्वाभिमान गहाण ठेऊ नका
उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दौऱ्यात पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. गेले ते इतिहासजमा होतील, असे म्हणत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर टीपण्णी केली. तर, जायचंय तर जा, पण एखाद्याच्या पाया पडण्याइतका स्वाभिमान गहाण ठेऊ नका, असे म्हणत उस्मानाबादमध्ये पाटील यांच्यावर निशाणा साधला.
उस्मानाबाद येथील सभेत पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री म्हणत आहेत, मी पाच वर्षांतील कामांचा हिशेब द्यायला निघालोय. हिशेब लिहिणे चांगलीच गोष्ट आहे... पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी उपरोधिक टीका पवार यांनी फडणवीसांवर केली. माजी मंत्री डॉ़ पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची घडी पुन्हा बसविण्यासाठी शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षांतर केलेल्या नेत्यांवर सडकून टीका केली.
मी आताच्या नेत्यांसारखे पक्षांतर कधी केले नाही़ उलट मी स्वत: नवीन पक्ष काढले. पक्षांतर करणाऱ्यांनी किमान एवढे तरी करून दाखवायचे होते. विकासासाठी नव्हे तर ईडी आणि सेबीच्या भीतीने ते लोक पळत आहेत. 40 वर्षांपेक्षा जास्त काळ ज्यांना सत्तेत बसविले त्यांना आपल्या भागाचा विकास करून घेता आला नाही, त्यांना आम्ही सन्मान दिला पहिल्या रांगेत बसविले, आता ते अशा ठिकाणी गेलेत जिथे बस म्हटले की बसावे लागते. स्वत:ला सिंह म्हणवून घेणारेदेखील शहांच्या दर्शनाला गेले, असा टोला त्यांनी राणाजगजितसिंह यांना लगावला. दरम्यान, सोलापूर येथील अमित शहांच्या सभेत भाजप प्रवेशावेळी राणाजगजितसिंह यांनी अमित शहांच्या पाया पडून दर्शन घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याची चर्चा उस्मानाबाद जिल्ह्यात रंगली होती.
राष्ट्रवादीच्या सभेत मनसेचे गाणे !
सोलापूर येथेही शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी कार्यक्रमस्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित ‘तुमच्या राजाला साथ द्या हे’ हे गाणे लावण्यात आले होते.