तीर्थकुंड प्रकरणात रोचकरींना झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:36 AM2021-08-12T04:36:33+5:302021-08-12T04:36:33+5:30
उस्मानाबाद : तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंडावर कब्जा केल्याचा दावा करत जिल्हाधिकार्यांनी कब्जेदार देवानंद रोचकरीवर फौजदारी कारवाईचे आदेश काढले ...
उस्मानाबाद : तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंडावर कब्जा केल्याचा दावा करत जिल्हाधिकार्यांनी कब्जेदार देवानंद रोचकरीवर फौजदारी कारवाईचे आदेश काढले होते. त्यास विरोध दर्शवत रोचकरींनी नगरविकास खात्याकडे अपील केले. त्यावर सुनावणी होऊन नगरविकास खात्याने हे अपील फेटाळून लावत मंगळवारी रोचकरींना जोर का झटका दिला.
तुळजापूर शहरात असलेल्या मंकावती तीर्थकुंडास प्राचीन, अध्यात्मिक वारसा आहे. मात्र, येथील देवानंद रोचकरी यांनी यांनी तीर्थकुंड हे विहीर असल्याचे दाखवत ती आपल्या पूर्वजांची मिळकत असल्याचे कागदोपत्री तयार केले. त्याआधारे त्यांनी तीर्थकुंडावर कब्जा करून त्यावर बांधकामही सुरू केले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशी लावली होती. समितीच्या अहवालानंतर हा कब्जा बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यांनी फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात रोचकरी यांनी २ ऑगस्टला नगरविकास खात्याकडे अपील केले होते. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कारवाईला दिलेली स्थगिती मागे घेत रोचकरींचे अपील फेटाळून लावण्यात आले आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेशही कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हा रोचकरींना जोरदार झटका मानला जात आहे. सोबतच प्रशासनापुढील कारवाईचा मार्गही आता मोकळा झाला आहे. आता प्रशासन किती वेगाने ही कारवाई पुढे नेते व तीर्थकुंडाला कब्जातून सोडवते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.