उस्मानाबाद : कसबे तडवळे येथील एका विवाहित महिलेने शनिवारी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली होती़ पतीच्या लक्षात ही बाब आल्यानंतरही त्याने या घटनेची वाच्यताच केली नाही़ विशेष म्हणजे आपल्या दोन चिमुकल्यांसह दोन दिवस तो या प्रेतासोबत घरीच राहिला़ सोमवारी ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे़
कसबे तडवळे येथील राजश्री विनायक खारगे (२५) या महिलेचे तिच्या राहत्या घरात प्रेत असून, त्याची दुर्गंधी सुटल्याची माहिती सोमवारी रमेश खारगे यांनी ढोकी पोलिसांना दिली़ या माहितीवरुन पोलिसांनी तातडीने कसबे तडवळे गाठत घटनास्थळाची पाहणी केली़ मयत महिलेचे प्रेत हे सडलेल्या अवस्थेत होते़ त्यामुळे पंचनामा करुन पोलिसांनी मयत राजश्रीचा पती विनायक यास ताब्यात घेतले़ यानंतर घटनास्थळी गर्दी झाल्याने बंदोबस्त वाढवून पोलिसांनी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन घेतले व मयतेचा पती विनायक यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ सायंकाळी मयत राजश्रीवर कसबे तडवळे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत़
दरम्यान, प्राथमिक चौकशीत विनायकने आपली पत्नी राजश्री हिने शनिवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले आहे़ मात्र, दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्यानंतरही विनायकने ही घटना अगदी शेजाऱ्यांनाही सांगितली नाही़ घटनेनंतर आपल्या ईश्वरी (४) व युवराज (२) या चिमुकल्यांसह दोन दिवस तो त्याच घरात प्रेतासह राहिला़ प्रेत सडल्यामुळे सोमवारी दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाल्याने खुद्द विनायकनेच मग ही बाब शेजाऱ्यांना सांगण्यास सुरुवात केली़ यानंतर रमेश खारगे यांनी ही घटना कळविल्याचे ढोकी पोलिसांनी सांगितले़ पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करुन घेतली आहे़
‘आईला मुंग्या लागल्या आहेत़राजश्री खारगे या मयत झाल्याचे त्यांच्या चिमुकल्यांना समजलेच नाही़ रविवारी जेव्हा प्रेताला मुंग्या लागल्या तेव्हा चार वर्षीय ईश्वरी गल्लीत फिरुन ‘आई आजारी आहे, तिला मुंग्या लागल्यात’, असे सांगत होती़ मात्र, कोणी त्याकडे लक्ष दिले नसल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकांतून होत होती़
खुनाचा प्रकार नव्हे : तपास अधिकारीमाहिती कळाल्यानंतर घटनास्थळी जावून पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी आरोग्य केंद्रात दाखल केले़ तपासणी अहवाल सायंकाळी प्राप्त झाला असून, त्यात हा प्रकार आत्महत्येचाच असल्याचे नमूद आहे़ मयतेच्या पतीकडे या प्रकाराबाबत चौकशी सुरु असल्याचे तपास अधिकारी सहायक उपनिरीक्षक चव्हाण यांनी सांगितले़