उस्मानाबाद : जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीमध्ये ७३ गरोदर माता फडात कोयता चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गरोदरपणातील लसीकरणापासून या महिला वंचित राहू नयेत, यासाठी जि.प. आरोग्य विशेष मोहीम राबवीत, आरोग्य तपासणीसह लसीकरण केले आहे.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात एक-दाेन वर्षांआड पडणारा दुष्काळ, सिंचनाच्या ताेकड्या सुविधा अन् अत्यल्प क्षेत्र आदी कारणांमुळे ऊसताेड कामगारांची संख्या अधिक आहे. ऊसताेडणीसाठी फडात न गेल्यास उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने गराेदर मातांनाही आपल्या जाेडीदारासाेबत उसाच्या फडात जाऊन काेयता चालवावा लागतो. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सिंचनाच्या शाश्वत सुविधा नाहीत. त्यामुळे बीड, उस्मानाबादसह अन्य जिल्ह्यांतील लाेक ऊसताेडीसाठी जातात. ऊसताेडीसाठी न गेल्यास कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनताे. हीच अडचण ओळखून गराेदर महिलाही उसाच्या फडात काेयता चालवितात.
या महिलांची संख्या माेठी असल्याचे प्रथमदर्शनी समाेर आल्यानंतर आराेग्य विभागाकडून त्यांची आराेग्य तपासणी व लसीकरणासाठी तालुकानिहाय आराेग्य पथके नेमण्यात आली. या पथकांनी जिल्हाभरातील २१० ऊसताेडणी ठिकाणांना भेट दिली असता, सुमारे ५ हजार १६५ मजूर राबताना दिसून आले. यामध्ये थाेड्याथाेडक्या नव्हे तर तब्बल ७३ गराेदर माता आढळून आल्या. यापैकी अवघ्या ५२ गराेदर मातांची आराेग्य तपासणी झालेली आहे. म्हणजेच ३० टक्के गराेदर मातांची तपासणीच झालेली नाही. या सर्व गराेदर मातांचे लसीकरण, आराेग्य तपासणी करून घेण्यात आली. पुढील काळातही त्या-त्या भागातील आराेग्य केंद्रांच्या माध्यमातून संबंधित गराेदर मातांवर लक्ष ठेवले जाणार आहे.जिल्हाभरातील २१० ऊसताेडणीच्या ठिकाणी आराेग्य विभागाला ३७२ मुले आढळून आली. यांच्याही लसीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचे समाेर आले आहे. वंचित राहिलेल्या ७१ मुलांचे ‘आराेग्य’च्या पथकाकडून लसीकरण केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आराेग्य विभागाकडून विशेष माेहीम राबिवण्यात आली हाेती. यातून ७३ गराेदरमाता फडात काेयता चालवीत आहेत. या सर्व महिलांचे लसीकरण करून घेण्यात आले आहे. पुढील लसीकरणही त्या-त्या क्षेत्रातील आराेग्य केंद्राकडून करून घेण्यात येणार आहे.-डाॅ. हनुमंत वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी.