साहित्य संमेलनाच्या यजमानपदासाठी स्थळ पाहणी समिती १६ जुलैला उस्मानाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:10 PM2019-07-10T14:10:54+5:302019-07-10T14:15:11+5:30
उस्मानाबादला बहुमान मिळण्याची शक्यता
उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या यजमानपदासाठी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या उस्मानाबादकरांचा मार्ग यावेळी सुकर होताना दिसत आहे. संमेलनाच्या आयोजनासंदर्भात महामंडळाने निश्चित केलेले स्थळ पाहणी पथक १६ व १७ जुलै रोजी उस्मानाबादेत दाखल होत आहे़ याअनुषंगाने मसाप व उस्मानाबादकरांनी जोरदार तयारी चालविली आहे़
मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी व संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलन व्हावे याकरिता मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. आगामी संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी करण्यात आली होती. पैकी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन मागण्यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. त्यानुसार स्थळ पाहणीकरिता महामंडळाची समिती या दोन ठिकाणी भेट देणार आहे. १६ व १७ जुलै रोजी समिती उस्मानाबादेत आढावा घेईल, असे महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखा अध्यक्षांना पत्राद्वारे कळविले आहे. हे पथक संमेलन आयोजनाबाबत स्थानिक संस्थेकडून निधी संकलनासाठी करण्यात आलेली तयारी, मनुष्यबळ, संमेलनासाठी योग्य जागा, निमंत्रितांची व प्रतिनिधींची निवास व्यवस्था आदींबाबत माहिती घेऊन पाहणी करणार आहे.
मसापची आज बैठक
१७ जुलै रोजी स्थळ पाहणी समितीसोबत आयोजित बैठकीच्या पूर्वतयारीसाठी तसेच पथकासमोर सविस्तर मांडणी करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक होत आहे़ उस्मानाबादच्या हॉटेल रोमा पॅलेसच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी ५़३० वाजता ही बैठक आयोजित केली असल्याचे शाखाध्यक्ष नितीन तावडे यांनी कळविले़