तुळजापूरातून लोहारा तालुक्यात समावेश करण्यासाठी शिवकरवाडी ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 07:09 PM2019-02-11T19:09:23+5:302019-02-11T19:10:23+5:30
या उपोषणाला लोहारा विकास समितीने पाठींबा दिला आहे.
लोहारा (उस्मानाबाद ) : तुळजापुर तालुक्यातील शिवकरवाडी या गावचा लोहारा तालुक्यात समावेश करावा या मागणीसाठी शिवकरवाडी ग्रामस्थांनी सोमवारी लोहारा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले़ या उपोषणाला लोहारा विकास समितीने पाठींबा दिला आहे.
लोहारा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर शिवकरवाडी (ता.तुळजापूर) हे गाव आहे़ विशेष म्हणजे, शिवकरवाडी व हिप्परगा (रवा) या दोन्ही गावची ग्रामपंचायत हिप्परगा (रवा) असून, हिप्परगा (रवा) हे गाव लोहारा तालुक्यातील आहे. तर शिवकरवाडीचे महसूल तुळजापूर व पंचायत समिती लोहारा आहे. त्यामुळे शासकीय निमशासकीय कामकाजासाठी शिवकरवाडी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी शिवकरवाडी गावाचा लोहारा तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी मागील नऊ वर्षांपासून ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे़ मात्र, मागणीची दखल शासन, प्रशासन घेत नाही़ त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे़ या मागणीसाठी लोहारा विकास समिती व शिवकरवाडी ग्रामस्थांनी सोमवारी लोहारा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे़ या उपोषणात दिलीप जाधव, रसुल पठाण, धनाजी लांडगे, दत्तात्रय पुरी, धनराज शिवकर, चंद्रकांत शिवकर, अनिल शिवकर, सुरेश पुरी, आप्पा कांबळे हे सहभागी झाले आहेत़ या उपोषणाला लोहारा विकास समितीचे अध्यक्ष जालिंदर कोकणे, नागाण्णा वकील, शंकर जट्टे, व्यंकट घोडके, कालीदास गोरे आदींनी पाठींबा दिला.