स्नेहबंध ट्रेकर्स ग्रुपने सर केला हरिश्चंद्र गड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:13+5:302021-08-21T04:37:13+5:30
अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड हा ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखला जातो. इको फ्रेंडली ग्रुप सोलापूरच्या मार्गदर्शनाखाली ही सफर संपन्न झाली. ...
अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड हा ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखला जातो. इको फ्रेंडली ग्रुप सोलापूरच्या मार्गदर्शनाखाली ही सफर संपन्न झाली. निसर्गाचा मनमुराद आनंद देणारा परिसर हा प्रत्येकास आपल्या मोहात पाडतो. तेथील सर्व सौंदर्यस्थळे पाहताना ‘ये मौसम का जादू हैं मितवा’ याचीच अनुभूती येते. मानवाचे निसर्गाकडे दुर्लक्ष होत आहे. निसर्ग आपणास विविध घटनांच्या माध्यमातून त्याच्या शक्तीची जाणीव ही करून देत असतो. गडकिल्ल्यावरील भटकंती, ट्रेकिंग यातून मनुष्य निसर्गाच्या जवळ येतो. ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर समुद्रसपाटीपासून ४ हजार ८५० फूट उंचीवर असणारा अजस्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. या गडाचा इतिहास कुतूहलजनक, तर भूगोल विस्मयकारक आहे. सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठ्यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन-चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी आहे. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. श्रावण महिन्यात निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची केलेली उधळण पाहून मन प्रफुल्लित होते. उसळ्या मारत निघालेली नदी, सुरात गाणारे पक्षी, पायातल्या पैंजणासारखा मंजूळ आवाज करीत नितळ पाण्याचे वस्त्र लपेटून वाहणारे झरे पाहून प्रत्येक जणच आनंदित होतो. या मोहिमेत हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, मंगळ गंगा नदीचे उगमस्थान, केदारेश्वराची गुहा, तारामती शिखर, कोकणकडा, धबधबे, सतत धो-धो कोसळणारा पाऊस, अनेक भू-स्वरूपे इत्यादी ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणे पाहण्यात आली. हा गड विठ्ठल नरवडे, विनोद चुंगे, प्रा. डॉ. शिवाजी मस्के, ज्योतिबा जाधव, प्रा. डॉ. दीपक नारायणकर, प्रा.डॉ. अरविंद दळवी, परशुराम कोकणे यांनी इतर इको-फ्रेंडली सदस्यांसमवेत यशस्वीरीत्या सर केला.