ज्वारी अन् कडब्यालाही भाव मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:29 AM2021-04-14T04:29:32+5:302021-04-14T04:29:32+5:30
भूम : यंदा बाजारात ज्वारीसोबतच कडब्यालादेखील अपेक्षित भाव मिळत नसल्याने ज्वारी उत्पादक चांगलाच संकटात सापडला आहे. यामुळे कदाचित पुढील ...
भूम : यंदा बाजारात ज्वारीसोबतच कडब्यालादेखील अपेक्षित भाव मिळत नसल्याने ज्वारी उत्पादक चांगलाच संकटात सापडला आहे. यामुळे कदाचित पुढील काळात ज्वारीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, यातून ज्वारीचे कोठार म्हणून असलेली तालुक्याची ओळख पुसली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
भूम तालुका हा पूर्वीपासूनच ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. या भागात शेतशिवारही उत्तम दर्जाचे व मुबलक पाणीदार असल्याने ज्वारी हे पीक जोमात येते. म्हणूच शेतकरीवर्गाचे ७० टक्के अर्थकारण या पिकावर आधारित असते. यासोबतच बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. यामुळे पशूंची संख्याही मोठी आहे. या पशुंना उन्हाळ्यात चारा म्हणून ज्वारीचे चिपाड वापरले जाते. यामुळे ज्वारी अन् चाऱ्याचाही प्रश्न मिटत असल्याने बहुतांश शेतकरी आर्थिक अडचण असली तरी उसनवारी करून मोठ्या आशेने ज्वारीची पेरणी करतात.
तालुक्यात २० हजार ७६३ हेक्टर ज्वारी या पिकाचे सरासरी क्षेत्र असताना या हंगामात तब्बल २८ हजार ९०९ हेक्टर पेरणी झाली होती. ज्वारीला मागच्या वर्षी ३ हजार ५०० ते ४ हजार दरम्यान भाव मिळाला होता. तसेच ज्वारीच्या कडब्यासही १ हजार ६०० ते २ हजार भाव होता. तालुक्यातील ज्वारी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, बीड यांसारख्या मोठ्या शहरात व्यापारी वर्गाच्या वतीने पाठवण्यात येते. विशेषत: जूट, दगडी व मालदांडी या तीनही प्रकारच्या ज्वारीचे उत्पन्न तालुक्यात होते. यावर्षी ऐन कणीस भरणीच्या वेळेस तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारीचे कोठार आडवे पडले. ज्वारीचे चिपाड खाली पडल्याने कणीस भरले नाही. शिवाय, जे कणीस भरले तेही मळणीनंतर काळे व डागिल झाल्याने या वेळेस ज्वारीस केवळ १६०० ते १८०० भाव मिळत आहे. कडब्याचे दरदेखील १२०० ते १५०० आले आहेत. तसेच मागणीदेखील कमी झाली. असे असताना दुसरीकडे मजुरांची रोजंदारी मात्र वाढली आहे. यंदा मजुरांनी ७०० गुत्त्याने काम घेण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण गणितच कोलमडले. काढणीसाठी एकरी ६ हजार रुपये, तर एक ज्वारीची पेंडी बांधण्यास ३ रुपये भाव मजूर घेत असल्याने काढणी, बांधणी व मोडणी यातच शेतकऱ्यांचा दम घोटत आहे. त्यामुळे यापुढील काळात केवळ घरी खाण्यापुरतीच ज्वारी करायची, असा निराशावादी सूरही काही शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागल्याने तालुक्याचे ज्वारीचे कोठार हे नाव पुसून निघते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
कोट.........
यंदा पाऊस चांगला झाल्याने उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळेल, अशी आशा होती. याच भरवशावर पेरणी केली. परंतु, १ हेक्टरमधील ज्वारी काढण्यास व बांधण्यास ३० हजार रुपये खर्च आला असून, बाजारात ज्वारीचा भाव १६०० ते १८०० असल्याने झालेला खर्चदेखील निघणे अवघड झाले आहे. यामुळे यापुढे केवळ घरी खाण्यापुरतीच ज्वारी करावी की काय, असा विचार चालू आहे.
- आकाश शेंडगे, शेतकरी, भूम
ज्वारी या पिकास प्रत्येक वर्षी चांगला भाव असतो. मात्र, यावेळेस अवकाळी पावसाने झाेडपल्याने ज्वारी दागिल झाली. शिवाय, लॉकडाऊनमुळे मागणी कमी झाली आहे. परिणामी यंदा ज्वारीला अपेक्षित दर मिळाला नाही.
- भैय्या उंबरे, व्यापारी