शेतकरी कंपनीसह कृषी अधिकारी, तज्ज्ञांची बैठक
ईट : येथे येणाऱ्या खरीप हंगामासाठी सोयाबीन वर तूर बीजोत्पादन होणार आहे. यासाठी येथील रयत समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, सभासद, संबंधित कृषी अधिकारी आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे सोयाबीन संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. एस. पी. म्हेत्रे यांची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत कृषी विद्यापीठ कृषी विभाग व शेतकरी कंपनी यांच्यामार्फत येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन व तुरीचे उत्पादन करण्याचे नियोजन करण्यात आले. सोयाबीन व तुरीचे मूलभूत व पायाभूत बियाणे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कृषी अधिकारी व राहुरी कृषी विभागाचे संबंधित अधिकारी यांनी शेतकऱ्यांना दिले. तसेच बीज उत्पादन प्रक्रिया बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांच्या शेतातच बियाणे तयार होत असूनही मोठ-मोठ्या कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांना महागड्या दरात विकत घ्यावे लागते. आता शेतकरी कंपनी शेतकऱ्यांना बियाणे तयार करून त्यांनाच बीज उत्पादक शेतकरी बनविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. या बैठकीस तंत्र अधिकारी विवेक गुडूप, मंडळ कृषी अधिकारी निखिल रायकर, कृषी सहाय्यक आबासाहेब खटाळ, समूह सहाय्यक गणेश शेंडगे आदी उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रताप देशमुख, कैलास चव्हाण, दत्ता खामकर, प्रकाश हाडोळे, नाना लिमकर, संजय लिमकर आदींनीही चर्चेत सहभाग घेतला.