बीबीएफ यंत्राद्वारे साेयाबीन पेरणी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:43 AM2021-06-16T04:43:49+5:302021-06-16T04:43:49+5:30
मुळज शिवार : शेतकऱ्यांचा लाभला प्रतिसाद उमरगा : तालुक्यातील मुळज शिवारात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी ...
मुळज शिवार : शेतकऱ्यांचा लाभला प्रतिसाद
उमरगा : तालुक्यातील मुळज शिवारात खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी बीबीएफ यंत्राद्वारे प्रत्यक्ष सोयाबीन पेरणी कार्यशाळा साेमवारी घेण्यात आली. तालुका कृषी अधिकारी एस. एन. जाधव यांनी उज्ज्वल देवणीकर, प्रदीप चालुक्य यांच्या शेतातील पेरणीची पाहणी केली.
बीबीएफ रुंद, वरंबा, सरी पेरणी यंत्रामुळे बियाणे योग्य ४ ते ५ सेमी खोलीवर जाते. यामुळे योग्य पेरणी करता येते. शिवाय दोन ओळीतील आणि झाडांमधील अंतर योग्य राखण्यास मदत होते. त्याचबरोबर अतिरिक्त पाऊस झाल्यास सरीवाटे जास्तीचे पाणी बाहेर जाण्यास तर कमी पाऊस झाल्यास किंवा पावसात खंड पडल्यास सरीमध्ये साचलेले पाणी पिकास उपयुक्त ठरू शकते. रब्बी हंगामालाही याचा चांगला फायदा होतो. जमिनीत ओल कमी असताना पेरणी केल्यास बियाण्यांच्या उगवणीवर परिणाम होऊन नुकसान होण्याची शक्यता असल्याने मुबलक ओलीनंतरच खरीप पेरा करावा. शासनामार्फत ‘बीबीएफ’ यंत्र खरेदीवर अनुदान उपलब्ध आहे. कार्यशाळेवेळी शेतकऱ्यांनी ‘बीबीएफ’ बाबत उपस्थित केलेल्या शंका तसेच विचारलेल्या विविध प्रश्नांना कृषी अधिकारी एस. एन. जाधव यांनी उत्तरे दिली. यावेळी उज्ज्वल देवणीकर, प्रदीप चालुक्य, मारुती चव्हाण, नागेश बिराजदार, महेश तुकशेट्टी, मकरंद कुलकर्णी, रमेश शिंदे, भागवत बिराजदार, धैर्यशील चालुक्य, लक्ष्मण जमादार, कृषी सहाय्यक शरद आरीकर आदी शेतकरी उपस्थित हाेते.
चाैकट...
शेतकऱ्यांनी शक्यतो अधिक उत्पादन देणाऱ्या व उंच वाढणाऱ्या सोयाबीन वाणाची निवड करावी. किमान १०० मिमी पाऊस झाल्यानंतर बीज प्रक्रिया करून रुंद वरंबा व सरी बीबीएफ टोकन यंत्राच्या मदतीने गंधकयुक्त खतासोबत पेरणी केल्यास २० ते २५ टक्के अधिक उत्पादन घेता येते.
- एस. एन. जाधव, तालुका कृषी अधिकारी, उमरगा.