दुकानात शिरला भरधाव टिप्पर, दांम्पत्याचा चिरडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:22 PM2020-11-11T12:22:16+5:302020-11-11T14:32:25+5:30
या भीषण अपघातात दुकानामध्ये झोपलेल्या सहा पैकी दोघांचा मृत्यू झाला.
ढोकी (जि.उस्मानाबाद) : पुणे-लातूर मागार्वरील ढोकी येथे चालकाचे नियंत्रण सुटलेला एक भरधाव टिप्पर दुकानात घुसल्याने अपघात घडून आला. यामध्ये दुकानात झाेपलेले पती-पत्नी टिप्परखाली चिरडून जागीत मृत्युमुखी पडले आहेत. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे.
प्रकाश बाबुराव सुरवसे (५५) व मुद्रिका प्रकाश सुरवसे (५०), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दांम्पत्याची नावे आहेत. सुरवसे कुटुंब हे दुकानातच राहत होते. त्यांचे दुकान लातूर-पुणे रस्त्यालगत आहे. आपल्या मोठ्या मुलाकडे रात्रीचे जेवण करून हे दोघेही आपल्या दुकानात येऊन झोपले होते. समोरच्या बाजूला प्रकाश सुरवसे व त्यांची पत्नी हे दोघे झोपले होते. तर मागच्या बाजूला त्यांचा मुलगा, सून व त्यांची दोन मुले असे चौघेजण झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री ११ वाजेनंतर एक रिकामा टिप्पर लातूरच्या दिशेने निघाला होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेला येऊन दुकानात शिरला. समोरच्या बाजूला झोपलेले प्रकाश सुरवसे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी मुद्रका सुरवसे यांचा उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेताना रस्त्यातच मृत्यू झाला.
टिटू गणपत सुरवसे (६) व अक्षता प्रल्हाद सुरवसे (१०) हे चिमुरडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथे रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर गणपत सुरवसे व पल्लवी सुरवसे हे दोघे या अपघातातून बचावले. घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी पाठविण्यात मदत केली. दरम्यान, याच अपघातात या दुकानाशेजारील एक गॅरेज व अन्य दोन दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुकानांत कोणीही नसल्याने अनर्थ टळला. दरम्यान, मयत प्रकाश व मुद्रिका सुरवसे यांचे ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून दोघांवरही बुधवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी कळंब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.