तुळजापूर - येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या तीन वर्षापासून नगर परिषदेने बसविला नाही. त्यामुळे पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याचे काम लवकर सुरू करावे, अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी पालिकेसमाेर उपोषण केले जाईल, असा इशारा नगरसेवक राहुल खपले यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या पुन्यनगरीत गेल्या तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभिकरण करून बसविण्यासाठी काढलेला आहे. परंतु, नगर पालिकेने याचे काम अद्यापही पूर्ण केले नाही. जवळपास तीन शिवजयंती उत्सव अश्वारूढ पूर्णाकृती पुतळाविना साजरा करण्यात आले. त्यामुळे शहरातील आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. ही बाब लक्षात घेता नगर परिषदेने या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभिकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा आपण ११ फेब्रुवारी रोजी उपोषण करणार आहोत, असे राहुल खपले यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या पत्राची प्रत नगर परिषद मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.