चिकटा, मावामुळे ज्वारीचे कोठार संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:32 AM2021-01-03T04:32:13+5:302021-01-03T04:32:13+5:30
पाथरुड: भूम तालुक्यातील ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या पाथरुड परिसरातील हजारो हेक्टरवरील बहरलेल्या ज्वारीवर चिकटा मावा ...
पाथरुड: भूम तालुक्यातील ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या पाथरुड परिसरातील हजारो हेक्टरवरील बहरलेल्या ज्वारीवर चिकटा मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक संकटात सापडले असून, या रोगाचा ज्वारीच्या उत्पादन वाढीवर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना ज्वारीसारख्या पिकावरही औषधांची फवारणी करावी लागत आहे.
पाथरुड परिसरात यावर्षी सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर रबी ज्वारीची पेरणी झाली असून, बहुतांश ज्वारीचे पीक पोट्री ते फुलोरा अवस्थेत आहे. यावर्षी झालेल्या चांगल्या पर्जन्यमानामुळे सध्या पीक जोमदार आहे; परंतु सध्या या ज्वारी पिकावर मोठ्या प्रमाणावर मावा व चिकटा या घातक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील हजारो हेक्टरवरील पीक संकटात सापडले आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास याचा ज्वारीच्या उत्पादन वाढीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
असा होतो घातक परिणाम
सध्या ज्वारीचे पीक काही ठिकाणी पोट्री तर काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेतच चिकटा, मावा ज्वारीच्या पानावर, ताटावर पडल्याने ज्वारीच्या ताटातील रसरशीत रस हा मावा कीड शोषून घेतो. यामुळे त्या ताटाची ताकद कमी होते. परिणामी, ज्वारीचे दाणे बारीक तर काही ठिकाणी भरतही नाहीत. त्यामुळे एकंदरीतच चिकटा माव्यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सुरुवातीला लष्करी अळी व आता चिकटा माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने ज्वारीच्या पिकावरही तीन ते चार फवारण्या कराव्या लागत आहेत.
-काशीनाथ कानडे, शेतकरी.
हल्ली ज्वारी पिकावर मावा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. शिवाय, मावा खाणारीही मित्र कीड मोठ्या अवस्थेत दिसून येत आहे. त्यामुळे माव्याचे नियंत्रण निसर्गतः होणार आहे; परंतु या मित्र किडीची ओळख शेतकऱ्यांना नसल्यामुळे शेतकरी कीटकनाशके फवारणीवर भर देत आहेत. त्यामुळे या मित्र किडी नष्ट होत आहेत. मावाग्रस्त ज्वारीवर या मित्र किडींची कोणत्याही अवस्थेतील दोन किंवा तीन कीटक प्रति ज्वारीचा मोड याप्रमाणे असतील तर फवारणी करण्याची गरज नाही. ही मित्र कीड माव्याला खाऊन संपवते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य निरिक्षण करून फवारणीचा निर्णय घ्यावा.
- बी जी शिंदे, कृषी सहायक.