पालिकेची अडवणूक थांबवा अन्यथा आंदोलन करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:30 AM2021-03-25T04:30:06+5:302021-03-25T04:30:06+5:30
कळंब : वीज वितरण कंपनीकडून नगरपरिषदेची होत असलेली अडवणूक थांबवा अन्यथा कंपनीविरुद्ध आंदोलन करू, असा इशारा कळंबच्या नगराध्यक्षा सुवर्णा ...
कळंब : वीज वितरण कंपनीकडून नगरपरिषदेची होत असलेली अडवणूक थांबवा अन्यथा कंपनीविरुद्ध आंदोलन करू, असा इशारा कळंबच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, कळंब ही ‘क’ वर्ग नगरपरिषद आहे. मागील एक वर्षापासून कोरोना संसर्गामुळे कर वसुली ठप्प आहे. त्यामुळे आर्थिक समस्या भेडसावत आहेत. अशी परिस्थिती असतानाही न. प. ने पाणीपुरवठा योजनेची ८१ लाख रुपये वीजबिलाची रक्कम २० मार्च रोजी जमा केली. यानंतर वीज कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच वीजबिल ही न देता पथदिव्यांची वीज तोडणी करून शहराला वेठीस धरले आहे. वास्तविक नोव्हेंबर २०२० पर्यंतची पथदिव्यांची वीजबिले न. प. ने भरली आहेत. शिवाय, न. प. चा मालमत्ता कर, नळपट्टी, जुनी जकात थकबाकी वीज वितरण कंपनीकडे प्रलंबित आहे. न. प. ने वेळोवेळी मागणी करूनही वीज कंपनी ते भरत नाही. परंतु, न. प. व वीज कंपनी ही दोन्ही कार्यालये लोकांच्या सेवेसाठी असल्याने न. प. ने वीज कंपनीविरोधात कार्यवाहीचे पाऊल उचलले नाही. मात्र, न. प. ने ९० लाख रुपये भरले असतानाही वीज कंपनीला वीज पुरवठा खंडित करून शहरवासीयांचा छळ करीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
याबाबतचा आढावा घेऊन असा प्रकार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अन्यथा वीज कंपनीविरुद्ध आंदोलन करू, असा इशारा नगराध्यक्षा मुंडे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. वीज कंपनीविरोधात आता थेट नगराध्यक्षांनीच आंदोलनाचा इशारा दिल्याने न. प विरुद्ध वीज कंपनी असा नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.