उस्मानाबाद : जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन स्थळांचा विकास करून येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. केंद्र सरकारचे यासाठी सर्वतोपरी सहकार्य असून, स्वदेश दर्शन व प्रसाद योजनेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवून या भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
तालुक्यातील काजळा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यात प्रामुख्याने स्वामी रामानंद महाराज मठ येथे तीर्थक्षेत्र विकास निधीतून भक्त निवास बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, गाव अंतर्गत सिमेंट, गावांतर्गत बंदिस्त नाली बांधकाम, आदी विकासकामांचा समावेश आहे.
गावातील युवकांनी छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. शासनाच्या अनेक योजना आहेत; परंतु याची आपल्याला माहिती नसते. गावातील होतकरू तरुणांनी पुढे येऊन या योजनांचा अभ्यास करावा व आपल्याला सोयीस्कर असलेला एखादा उद्योग उभारणीसाठी प्रस्ताव तयार करावा. यासाठी आवश्यक कर्ज मंजुरीचा प्रस्ताव संबंधित बँकेकडे पाठवावा, आपण त्यांना सहकार्य करण्यास सांगू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रामानंद महाराज तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावर निकष पूर्ण करून प्रस्ताव सादर करावा, आपण यासाठी प्रयत्नशील राहू असे आ. पाटील यांनी गावकऱ्यांना आश्वासित केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि. प. सभापती दत्ता देवळकर, भाजप तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जि. प. सदस्य अभिमन्यू शितोळे, पं. स. सदस्य प्रदीप शिंदे, विष्णुदास आहेर, सरपंच प्रवीण पाटील, उपसरपंच नाना मडके, देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रदीप शेळके, ओम मगर, विजय हाऊळ, विलास खोचरे, चंदू पवार, रामचंद्र कदम, बप्पा पवार, विनोद बाकले, अमर बाकले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.