उस्मानाबाद- काेराेनामुळे मागील आठ ते नऊ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. अशा महामारीच्या संकटातही जिल्हा परिषद शाळेच्या अनेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये यासाठी धडपड सुरू ठेवली. किनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मंजूषा स्वामी अशांपैकीच एक. शाळा बंद आहेत, म्हणून शांत न बसता त्यांनी विज्ञानासाेबत विद्यार्थ्यांची गट्टी घडवून आणली.
काेराेना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच शाळा बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढावली. आता विद्यार्थ्यांचे कसे हाेणार, म्हणून पालक चिंतेत हाेते. यातून मार्ग काढत शासनाने ऑनलाइन शिक्षण सुरू केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे १०० टक्के समाधान हाेत नसले तरी काहीअंशी का हाेईना नुकसान टळले आहे. यापुढे जात काही गुरुजींनी माहिती-तंत्रज्ञानाचा आधार घेत नवाेपक्रम हाती घेतले. उस्मानाबाद तालुक्यातील किनी जिल्हा परिषद शाळेवरील मंजूषा मगर यापैकीच एक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान या विषयाबद्दल गाेडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ‘मैत्री विज्ञानाशी’ हा उपक्रम हाती घेतला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन माहितीपर प्रश्न पाठविले जात असे. ही माहिती वाचून संबंधित विद्यार्थी प्रश्न साेडवित असत. या माध्यमातून विद्यार्थ्यांची विज्ञानासाेबतची गट्टी अधिक घट्ट हाेण्याच मदत झाल्याचे शिक्षिका स्वामी यांनी म्हटले. यासाेबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
चाैकट...
गाेष्टींचा शनिवार...
शिक्षका स्वामी यांनी ‘मैत्री विज्ञानाशी’ यासाेबतच ‘गाेष्टींचा शनिवार’ हा उपक्रमही हाती घेतला आहे. नियमित अभ्यासक्रमासाेबतच त्यांना प्रेरणा मिळेल, अशा गाेष्टी वाचनात, तसेच ऐकण्यात याव्यात या उद्देशाने ‘गाेष्टींचा शनिवार’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. हाही उपक्रम विद्यार्यांच्या पसंतीस पडत आहे.
काेराेनाच्या काळात विद्यार्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचे माेठे आव्हान हाेते. ही बाब लक्षात घेऊनच ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. तेच ते न शिकविता त्यात नावीन्य आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांत शिक्षणाची गाेडी कायम राहिली. या कामी गटशिक्षणाधिकारी राेहिणी कुंभार यांचे मार्गदर्शन माेलाचे ठरले.
-मंजूषा स्वामी, शिक्षिका, किनी.