उस्मानाबादेतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह केवळ नावालाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 08:25 PM2019-07-06T20:25:30+5:302019-07-06T20:26:59+5:30
वसतिगृहात फक्त निवासाची सोय; मेसचा नाही पत्ता...
उस्मानाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान सरकारने या समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह सुरू करू, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार यंदा येथे वसतिगृह सुरू होत आहे. मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या धर्तीवर सदरील वसतिगृहात केवळ मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे अपेक्षित होते. परंतु, ज्यांचे उत्पन्न ८ लााखांच्या आत आहे, अशा सर्वच घटकांना प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, येथे केवळ निवासाची सोय आहे. जेवणाचा पत्ता नाही. आणि वसतिगृहासाठी जी वास्तू निश्चित केली आहे, तीही गैरसोयीचीच अधिक असल्याने संताप व्यक्त होत आहे.
मराठा समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृह असावे, अशी आरक्षणासह विविध मागण्यांपैकी एक असेली मागणी मराठा क्रांती मोर्चाने प्रत्येक मोर्चामध्ये लावून धरली होती. महाराष्ट्रबंदच्या आंदोलनातदेखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वसतिगृहाच्या मागणीचा मुद्दा उपसिथत केला होता. त्यानुसार समाजातील मुलांसाठी साधारपणे वर्षभरापूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये पहिले वसतिगृह कोल्हापूर येथे सुरू करण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षापासून उस्मानाबाद येथे डॉ़ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या माध्यमातून वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. वसतिगृहासाठी इमारतही निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या धर्तीवर केवळ समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे अपेक्षित होते. तसे आंदोलनादरम्यान सांगितलेही जात होते. मात्र, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असता, अनेक बाबी समोर येवू लागल्या आहेत. ज्यांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे, अशा सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.
मराठा समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आलेल्या अनेकांना जेवनाचा आणि निवासाचा खर्च भागवणे कठीण होते. हा प्रश्न लक्षात घेऊन आंदोलनादरम्यान वसतिगृहाची मागणी पुढे आली होती. मात्र, सरकार जे वसतिगृह सुरू करीत आहे, तेथे केवळ निवासाची सोय आहे. जेवनाचा (मेस) पत्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवनाचे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. हे थोडके म्हणून की काय, वसतिगृहासाठी निश्चित केलेली इमारतही सोयीची कमी अन् गैैरसोयीची अधिक आहे. तंत्रनिकेतन कॉलेज परिसरातील इमारतीत हे वसतिगृह चालविले जाणार आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला तेरणा महाविद्यालय अथवा भोसले कॉलेजला यायचे म्हटले तर दररोज प्रवास भाड्यापोटी किमान तीस ते चाळीस रूपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच प्रवास भाड्यावर महिन्याकाठी हजार ते बाराशे रूपये खर्च होतील. आणि शासन निर्वाह भत्ता म्हणून केवळ आठ हजार रूपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. सदरील रक्कम ज्या संस्थेने वसतिगृह चालविण्यासाठी घेतले आहे, त्यांना वर्ग करावी लागणार आहे. हे सर्व चित्र पाहता, मराठा विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह केवळ नावालाच उरते की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होवू लागला आहे.
विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ...
वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. १ जुलैै पासून ही प्रक्रिया सुरू झाली. परंतु, ५ जुलैैपर्यंत एकाही विद्यार्थ्याने वसतिगृहासाठी अर्ज केलेला नाही. केवळ निवासाचीच सोय असल्याने विद्यार्थ्यांत निरूत्साह आहे.
मुलींच्या वसतिगृहाचे काय?
मराठा समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मुलांसाठीचे वसतिगृह सुरू होत असले तरी मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाकडे कसल्याही स्वरूपाची माहिती आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.