परंडा (उस्मानाबाद ) : राज्यातील साखर कारखानदारांकडून सातत्याने अन्याय केला जात असल्याचा आरोप करत ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने आज दुपारी परंंडा शहरात रास्तारोको करण्यात आंदोलन केले. डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या आंदोलनात मागण्या मान्य होईपर्यंत उसाचे एक टिपरूही उचलणार नसल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम मोरे यांनी यावेळी दिला़
महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने विविध मागण्यांसाठी २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे़ ऊस वाहतूक ठेकेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत़ मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उसाचे एक टिपरुही उचलणार नसल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम मोरे यांनी दिला. परंडा- बार्शी- करमाळा- कुर्डवार्डी राज्य मार्गावरील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती़
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष धोंडीराम पाटील, बाबासाहेब चव्हाण, बापू मिस्कीन, तालुका उपाध्यक्ष मनोज काळे, लक्ष्मण मोरे, तालुका सचिव समाधान गरदडे, नवनाथ गाडे, नामदेव भोरे, संतोष सोनवर, गोकुळ खैरे, राजेंद्र राऊत, जाकीर मुल्ला, फकीर पावले, हनुमंत बंडगर, अशोक खैरे, अतुल थिटे, बापू विटकर, लक्ष्मण देशमुख, धनाजी चोबे आदी उपस्थित होते. जवळपास एक तास आंदोलन करण्यात आले़ रस्तारोको आंदोलनात मोठया संख्येने वाहतूक ठेकेदार सहभागी झाले होते. यावेळी नायब तहसीलदार तुषार बेरकर यांनी निवेदन स्विकारले. परंडा पोलीस ठाण्याचे फौजदार संतोष माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या आहेत मागण्या :- वाहतूक दर व कमिशन दर दुप्पट करून महाराष्ट्रातील सर्व कारखान्यात एकच दर लागू करावा, ही दरवाढ दरवर्षी सुधारित करण्यात यावी
- ऊस वाहतूक ठेकेदार व ऊस तोडणी ठेकेदारांचे स्वतंत्र करार करावेत
- अॅडव्हान्सची रक्कम वाहतूक ठेकेदारांना एकरकमी द्यावी
- अॅडव्हान्ससाठी कर्ज प्रकरण करताना हे कर्ज प्रकरणे बँकांनी थेट वाहतूकदारांसोबत करावे
- कारखान्यांनी दुहेरी करार करून कारखान्यांचे वाहतूक दर, कमिशन दर वाढवून द्यावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या़