फोटो (२-१) मुकूंद चेडे
वाशी : शेतकऱ्यांनी त्यांच्या गैरसोय दूर करण्यासाठी शिवरस्त्यासह इतर शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अावाहन तहसीलदार नरसिंग जाधव यांनी केले.
वाशी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे़ यामुळे विशेषत: पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शेतकऱ्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी शासनस्तरावर रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत़ याअंतर्गत गोजवडा-झिन्नर-दसमेगाव हा शिवरस्ता देखील अतिक्रमणमुक्त करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. करण्याप्रसंगी व्यक्त केले़
गट नंबर ७६१,७६२,७६३,२२४ आदी गटातून जाणारा गोजवडा-झिन्नर-दसमेगाव हा शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद होता़ यामुळे तो अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी नरसिंग थोरबोले, खंडू मस्के, मुकुंद माळी, धनजंय मुंजाळ आदींनी प्रशासनाकडे केली होती. नरसिंग थोरबोले यांच्या अर्जावरून महसूल प्रशासनाने स्थळ पाहणी करून ३० डिसेंबर रोजी या परिसरातील शेतकऱ्यांचे समुपदेशन केले. तहसीलदार नरसिंग जाधव, मंडळ अधिकारी डी़ ए़ माळी, तलाठी एम़ जी. खोत, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व या परिसरातील शेतकरी यांच्यासह स्थळ पाहणी करून सर्वाच्या सहमतीने शिवरस्ता अतिक्रमण मुक्त करत मोकळा केला़ या रस्त्यामुळे या भागातील शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना शेतीकडे ये-जा करण्यासाठी चांगली सोय झाली आहे. शिवाय, पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे़ या शिवरस्त्याचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजबुतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़
चौकट.....
तालुक्यातील खानापूर-इंदापूर हा रस्ताही बऱ्याच दिवसांपासून बंद पडला होता़ नितीन कांबळे, ज्ञानोबा कदम, दादाराव कदम, प्रल्हाद कदम, आदींच्या शेतातून हा रस्ता जात असून, एक किलोमिटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपी निर्माण झाली होती़ दरम्यान, या भागातील शेतकऱ्यांना विश्वासात घेत नायब तहसीलदार भालचंद्र यादव, मंडळ अधिकारी डी़ ए़ माळी, तलाठी ए़ आऱ. साबळे यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांची सामुहिक बैठक घेत हा शेतरस्ता देखील अतिक्रमण मुक्त केला आहे़