डेंग्यूसदृश आजाराने घेतला दहा वर्षीय चिमुरडीचा बळी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:35 AM2021-08-22T04:35:38+5:302021-08-22T04:35:38+5:30
कळंब : शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूसदृश आजाराने चांगलेच पाय पसरले आहेत. याची अनेक कुटुंबाना झळ बसत असतानाच शहरातील शिवाजीनगर ...
कळंब : शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूसदृश आजाराने चांगलेच पाय पसरले आहेत. याची अनेक कुटुंबाना झळ बसत असतानाच शहरातील शिवाजीनगर भागात वास्तव्य करणाऱ्या एका दहा वर्षीय मुलीचा डेंग्यूसदृश आजाराने बळी घेतला असल्याचे समोर आले आहे.
शहरासह तालुक्यातील विविध गावात डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढल्याने अनेक कुटुंबाना याचा त्रास सहन करावा लागला आहे. यासंदर्भात आरोग्य यंत्रणेकडे माहिती उपलब्ध नसली तरी खाजगी दवाखाने मात्र भरलेले असतात, ही वस्तुस्थिती आहे. ‘लोकमत’ने यासंबंधी प्रकाशझोत टाकल्यानंतर संशयितांचे ‘सॅम्पल कलेक्शन’, गृहभेटी, कीटक सर्वेक्षण, अबेटींग यावर काही गावात भर देण्यात आला होता. नगर परिषदेनेही धूर फवारणीसह अन्य उपाययोजना हाती घेतल्या होत्या. परंतु, लक्षणे असणाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसून येत नव्हती.
यातच शहरातील शिवाजीनगर भागात वास्तव्य करणाऱ्या श्रेया सतीश गंभिरे (मूळ गाव गंभीरवाडी ) या दहा वर्षीय मुलीचा लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना डेंग्यूने बळी घेतला आहे. यासंदर्भात आरोग्य यंत्रणेने कानावर हात ठेवले असले तरी वडिलांनी आपल्या मुलीचा डेंग्यूनेच मृत्यू झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून इतरांना अवगत केले आहे.
चौकट...
समन्वयाचा अभाव....
दरम्यान, आरोग्य यंत्रणेने कीटक सर्वेक्षण, गृहभेटी, नमुना तपासणी करत उद्भवलेल्या भागांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थेला देणे अपेक्षित असते. यानंतर त्या स्थानिक स्वराज्य संस्थानी फॉगिंग, ॲबेटींग, स्वच्छता, जनजागृती यावर भर दिला पाहिजे. मात्र, यासंबंधी समन्वयाचा मोठा अभाव दिसून येत आहे.
माहिती नेमकी कोणाकडे ?
एकीकडे सरकारी यंत्रणेकडे नियोजनाचा अभाव असताना दुसरीकडे खाजगी रुग्णालयात आकडा मोजायचा कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही माहिती दस्तुरखुद्द उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य कार्यालयाकडेच नसते. यामुळे यासंबंधीची आकडेवारी समोर येत नाही. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. वायदंडे यांनी खाजगी रुग्णालयास माहिती देण्यासाठी पत्र दिले आहे, असे सांगितले.