उस्मानाबाद : जून आणि अर्धाअधिक जुलै महिना सरत आला असतानाही वार्षिक सरासरीच्या केवळ १८.८ टक्के पाऊस झाला आहे. अत्यल्प पर्जन्यमानाचा परिणाम थेट खरीप पेरणीवर होवू लागला आहे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्याने शेतकरी पेरणी कासव गतीने सुरू आहे. आजघडीला अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. असे असले तरी सुमारे सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावर अद्याप पेरणी होणे बाकी आहे. त्यामुळे दुष्काळाचे चटके सोसणारे शेतकरी मोठ्या पावसाकडे नजरा लावून बसले आहेत.
गतवर्षी जून महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. परंतु, यंदा याच्या उलट चित्र आहे. संपूर्ण जून महिन्यात वार्षिक सरसरीच्या अत्यल्प पर्जन्यमान झाले. जुलै महिन्यात तरी दमदार पाऊस होईल, असे अपेक्षित होते. परंतु, अर्धाअअधिक जुलै सरत आला असतानाही सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. सरासरी १८.८ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे. सर्वात कमी १०.५ टक्के पाऊस लोहारा तालुक्यात झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. आजवर अवघा १२.२ टक्केच पाऊस पडला. उमरगा, भूम याही तालुक्यात फारसे समाधानकारक चित्र नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अत्यल्प पर्जन्यमानाचा थेट परिणाम खरीप पेरणीवर होताना दिसत आहे. मंडळनिहाय झालेल्या पावसावर नजर टाकली असता, अत्यंत विदारक वास्तव समोर येते. असमान पाऊस होत असल्याने एकेका मंडळात अद्याप पेरणीला सुरूवातही झालेली नाही.
संपूर्ण जिल्ह्यात मिळून केवळ ३४.२२ टक्के पेरणी झाली आहे. उस्मानाबाद तालुक्यात पेरणीचा टक्का सर्वात कमी आहे. आजघडीला अवघ्या १३.९२ म्हणजेच अवघ्या १४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ८९ हजार हेक्टर पैकी तब्बल ७६ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पेरणीविना आहे. यानंतर भूम तालुक्याचा क्रमांक लागतो. २९ हजार २०० हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित असताना ८ जुलै अखेर केवळ ७ हजार २०० म्हणजेच २४ टक्के क्षेत्र पेरणीखाली आले आहे. परंडा तालुक्यातील चित्रही चिंताजनकच आहे. मागील दीड महिन्यात २६.६८ टक्के पेरणी झाली आहे. १७ हजार हेक्टर पैकी साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी होवू शकली. वाशी तालुक्यातील ३९ हजार ४०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित असताना १३ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. याचे प्रमाण ३४.२४ टक्के आहे. दरम्यान, खरीप पेरणीत कळंब अव्वल आहे. जवळपास ५८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ६४ हजार ३०० पैकी ३७ हजार ७०० हेक्टवर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उमरगा आणि लोहारा तालुक्यात अनुक्रमे ३९ व ३६ टक्के पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अपुऱ्या ओलीवर पेरणी केली. त्यामुळे बियाण्याची उगवण झाली नसल्याचे तक्रारीही आता येऊ लागल्या आहेत.