गूढ आवाजाने पंधरा दिवसातून तिसऱ्यांदा उस्मानाबाद जिल्हा हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:11 PM2020-02-26T14:11:52+5:302020-02-26T14:14:08+5:30
उस्मानाबाद जिल्ह्यात गूढ आवाजाचा पुन्हा हादरा
उस्मानाबाद : जिल्ह्याच्या काही भागात सातत्याने जोरदार आवाज होऊन त्याचा जबर हादरा बसत आहे़ या आवाजाचे गूढ उकलण्यात अजूनही प्रशासनाला यश आले नाही़ मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब तालुका परिसर या आवाजाने पुन्हा हादरला़
उस्मानाबाद जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांमध्ये तीनवेळा जोरदार आवाजाचा हादरा नागरिकांना बसला आहे़ मंगळवारी दुपारी १ वाजून ३७ मिनिटाला हा गूढ आवाज झाला़ या आवाजाने कळंब तालुक्यातील इटकूरसह इतर गावे तसेच भूम तालुक्यातील ईट, भूम शहर व परिसर, परंडा तालुक्यातील जवळासह अन्य गावांमध्ये या आवाजाची तीव्रता जाणवली़ जोरदार आवाजामुळे घरावरील पत्रे, तावदाने आदळली़ असे आवाजा जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सातत्याने होत आहेत़ या आवाजाची नोंद ही भूकंपमापन केंद्रातही होत नाही़ शिवाय, यावर नागपूरच्या ‘जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया’ या संस्थेच्या माध्यमातून दोनवेळा अभ्यास करण्यात आला आहे़ मात्र, कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत प्रशासनाला पोहोचता आलेले नाही़
ठोस कारण अजूनही समजले नाही
भूगर्भातील पाण्याचा स्तर खालावू लागल्यानंतर निर्माण होणाऱ्या पोकळीतील हवा ही एखाद्या बोअरच्या किंवा अन्य छिद्राच्या माध्यमातून बाहेर पडते, तेव्हा असा आवाज होतो, असेच स्पष्टीकरण बहुतांश वेळा उस्मानाबाद जिल्ह्यात सातत्याने होणाऱ्या या आवाजाबाबत मिळते़ दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा एकदा यावर सर्वेक्षण झाले आहे़ मात्र, त्याचा अहवाल अजून तयार झाला नसल्यामुळेही ठोस कारण समोर येऊ शकलेले नाही़