कळंब (जि. उस्मानाबाद) : तपासणीस आलेल्या पथकाला अभिलेख्यांची उपलब्धता न करून देणे, कामकाजाच्या वेळेत दुकान बंद ठेवणे आदी ठपके ठेवत कळंब तालुक्यातील तीन गावांतील स्वस्त धान्य दुकानाचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
कळंब शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना रास्त दरात धान्य मिळावे यासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्था राबवण्यात येते. यासाठी तालुक्यात जवळपास १४० स्वस्त धान्य दुकानांना परवाने देण्यात आले आहेत. या दुकानातून अन्न सुरक्षा अभियान, अंत्योदय योजना यासारख्या विविध योजनेतील शिधापत्रिकाधारकांना धान्याचा पुरवठा करण्यात येतो. कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने २७ जून २०१७ रोजी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकांनाची मागील एक वषार्तील दफ्तर तपासणी केली.
यामध्ये वाकडी केज, कोठाळवाडी व भाटसांगवी येथील स्वस्त धान्य दुकांनाची दोन नायब तहसीलदार, दोन अव्वल कारकून यांच्या पथकाने झाडाझडती घेतली. तपासणीदरम्यान अनियमितता आढळून आल्यानंतर २२ जानेवारी २०१८ रोजी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. दुकानदारांनी नोटिसेचा खुलासाही दाखल केला. परंतु, तो समाधानकारक नसल्याचे स्पष्ट करीत वाकडी केज येथील एन. बी. कोल्हे, कोठाळवाडी येथील एस. बी. गायकवाड व भाटसांगवी येथील मंजूळा महिला बचत गट या तीन स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ही कारवाई केली आहे.
हे आहेत ठपकेभाटसांगवीे येथील दुकानांवर तपासणीसाठी अभिलेखे उपलब्ध न देणे, दोन महिन्याचा कोटा न उचलने हे ठपके ठेवण्यात आले आहेत. वाकडी के येथील दुकानांवर धान्याचे नमुने न ठेवणे, अन्नसुरक्षा व अंत्योदय विक्री योजना नोंदवहीतील गोषवाऱ्यात खाडाखोड करणे, धान्य पुरवठ्यात तूट दर्शवणे हे ठपके तर कोठाळवाडी येथील दुकांनावर कामकाजाच्या वेळेत दुकांन बंद ठेवणे, संपर्क करूनही अभिलेखे उपलब्ध न करून देणे आदी ठपके ठेवण्यात आले आहेत.