तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत येणारी सांगवी (काटी), गोंधळवाडी, पिंपळा (खुर्द) ही तीन गावे वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मागील आठ दिवसांपासून अंधारात बुडाली आहेत.
विजेअभावी मोबाईल चार्जिंग होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला तर ब्रेक लागलाच आहे, पण दळण- कांडपाच्या प्रश्नासह गावकऱ्यांची इतरही अनेक दैनंदिन कामे खोळंबली आहेत. गावातील पिठाची गिरणी बंद पडल्याने दळणासाठी परगावला जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
ट्रान्सफाॅर्मरमध्ये टाकण्यासाठी महावितरण कंपनीकडे ऑईल नाही. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत असल्याचे सांगितले जात आहे.
तीन महिन्यापूर्वी सांगवी (काटी) गावाचा ट्रान्सफाॅर्मर जळाला होता. त्यावेळी हे गाव २० दिवस अंधारात होते. तीनवेळा ट्रान्सफार्मर बदलले, तरी ते जळालेलेच निघाले. सांगवी गावासाठी कमी क्षमतेचा ट्राम्सफार्मर दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. सांगवी गावासाठी वाढीव क्षमतेचा ट्रान्सफार्मर मंजूर करून वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी सरपंच ललिता मगर, उपसरपंच मिलींद मगर यांनी केली आहे.