भुईसपाट झालेली ज्वारी कापून काढण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:18+5:302021-03-05T04:32:18+5:30
(फोटो : संतोष मगर ०३) लोकमत न्यूज नेटवर्क तामलवाडी : मागील पंधरवड्यात वातावरणात बदल झाल्याने परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी ...
(फोटो : संतोष मगर ०३)
लोकमत न्यूज नेटवर्क
तामलवाडी : मागील पंधरवड्यात वातावरणात बदल झाल्याने परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी भुईसपाट झाली असून, सध्या ज्वारी उपटून काढण्याऐवजी कापून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुसरीकडे मजुरीचे दरही कमालीचे वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
दिनांक १८ फेबुवारीच्या मध्यरात्री या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे ज्वारीचे पीक भुईसपाट झाले. आडव्या पडलेल्या ज्वारीच्या कणसाला उंदीर लागून वाळवी चढली. सध्या सांगवी, गोंधळवाडी, पांगरदरवाडी, सावरगाव, काटी, माळुंब्रा पिंपळा भागात ज्वारीचे पीक जोमात आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारी काढण्यास सुरुवात केली असून, आडवी पडलेली ज्वारी उपटून काढण्यासाठी शंभर पेंढ्यासाठी ६०० रुपये तर विळ्याने कापून काढण्यासाठी ४५० रूपये मजुरी द्यावी लागत आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मजूर गोंधळवाडी भागात दाखल झाले असून, मजुरीचा दर वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट वाढले आहे.
चौकट
कापणीचा कडबा टिकत नाही
आडवी पडलेली ज्वारी मुळासकट उपटून काढली तर तो ज्वारीचा कडबा चारा म्हणून वर्षभर टिकून राहतो. परंतु, विळ्याने कापून काढलेल्या कडब्याच्या पेंढ्या टिकत नाहीत. पावसाने बुडका भिजून काळा पडतो. जनावरे हा कडबा खात नाहीत, असे गोंधळवाडी येथील शेतकरी नितीन सातपुते यांनी सांगितले.