उस्मानाबाद : पुत्र सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे देवी-देवतांच्या दर्शनवारीवर निघाले आहेत़ बुधवारी त्यांनी तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या चरणी माथा टेकवून आपली राजकीय भूमिका, वाटचाल गुरुवारी सार्इंच्या दर्शनानंतर हायकमांडशी चर्चा करुन जाहीर करु, असे माध्यमांशी बोलताना सांगितले़
सुजय विखे यांचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर बुधवारी राधाकृष्ण विखे यांनी तुळजापूर गाठले़ त्यांनी मोजक्याच काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह मंदिर गाठत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आराधना केली़ जवळपास अर्धा तास मंदिरात थांबल्यानंतर माघारी परतताना त्यांनी माध्यमांशी सुजय यांच्या प्रवेशावर बोलण्यास बोलण्यास नकार दिला़ मात्र, गुरुवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करुन आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करु, असे सांगितले.
दरम्यान, अधिक बोलण्यास नकार दिल्याने त्यांनी तुळजाभवानी देवीला नेमके काय साकडे घातले, हे कळू शकले नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे मनातली घालमेल अधोरेखित करीत होते़ तुळजापुरातील दर्शनानंतर ते पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना झाल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले़ आता गुरुवारी साईबाबांच्या चरणी लीन झाल्यानंतर ते कोणती भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे़