कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराच्या विविध भागात आतापर्यंत ४९ रुग्ण आढळून आले आहेत. यात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या कोविड सेंटरमध्ये शहरातील २३ जणांवर उपचार सुरू आहेत. तर उपचारानंतर बरे झालेल्या २० आतापर्यंत जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. याशिवाय घरामध्ये तीन तर उमरगा येथे एकावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी जनता कर्फ्यू असल्याने मेडिकल वगळता सर्व अत्यावश्यक दुकाने कडकडीत बंद होती. गुरुवारी आणि शुक्रवारी मात्र रस्त्यावर गर्दी दिसून येत होती. दरम्यान, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संचार बंदीच्या नियमांची अधिक कडक अंमलबजावणी करण्यासाठी नवीन निर्बंध लावले असून, यानुसार सर्व अत्यावश्यक दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच उघडी राहणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून तरी रस्त्यावरील गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
चौकट......
आता तरी काळजी घ्या
मुरूमच्या कोविड सेंटरमध्ये १२० बेडची व्यवस्था असली तरी येथे ऑक्सिजनची सोय नाही. त्यामुळे केवळ सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जातात. शिवाय उमरगा, उस्मानाबाद, तुळजापूर येथील कोविड रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. उपचारासाठी बेडही लवकर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी काळजी घेऊन मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजीत डुकरे यांनी केले आहे.