उस्मानाबाद : कोरोना संसर्गाची गंभीरता लक्षात घेऊन श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने मंदिर संस्थानने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत पुजारी, महंत, सेवेकरी व मानकरी वगळता भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे गुरुवारी सायंकाळी स्पष्ट करण्यात आले़.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव दि. ९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. परंतु, सध्या सर्वत्र कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार मंदिर संस्थानने मार्गदर्शक सूचना लागू केल्या़ असून नवरात्रात भाविकांना दर्शनासाठी श्री क्षेत्र तुळजापूर शहरात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही.
या कालावधीत भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी कोणत्याही नवरात्र मंडळास, भाविकास तुळजापूर शहरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. श्री तुळजाभवानी देवीचे शारदीय नवरात्र महोत्सवात पुर्वापार प्रथेप्रमाणे होणारे कुलाचार, धार्मिक विधी व पुजेसाठी आवश्यक असणारे पुजारी, महंत, सेवेकरी व मानकरी यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. याची परवानगी उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद, उपविभागीय पोलिस अधिकारी तुळजापूर व मंदिर तहसीलदार यांच्याकडून घ्यावी लागणार आहे.
नवरात्र महोत्सवात भाविकांनी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेत स्थळावरून ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहनही संस्थानने केले आहे.