उस्मानाबादेत पोलीस निरीक्षकाच्या घरात सापडली चोरीची दुचाकी, कर्नाटक पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 08:49 PM2018-04-03T20:49:11+5:302018-04-03T21:07:25+5:30
मूळचे वाशी येथील रहिवासी असलेले व लातूर जिल्ह्यातील जळकोट ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या वाशी येथील घराची आज कर्नाटक पोलिसांनी झडती घेतली.
वाशी (उस्मानाबाद) : मूळचे वाशी येथील रहिवासी असलेले व लातूर जिल्ह्यातील जळकोट ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या वाशी येथील घराची आज कर्नाटकपोलिसांनी झडती घेतली. त्यात चोरीस गेलेली एक दुचाकी आढळून आली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.
कर्नाटकातील कमलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमएच २४ एजे ४४२९ क्रमांकाची एक दुचाकी चोरीस गेली होती़ या दुचाकी चोरीचा तपास करीत असताना कमलनगर पोलिसांना ती वाशी येथील चंद्रसेन देशमुख यांच्या तपोवन भागातील घरात असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने आज कमलनगर ठाण्याचे सहायक फौजदार तानाजी बेलकट्टे यांनी वाशी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चोरगे, कर्मचारी बोबडे, गोरे यांच्या मदतीने घराचे कुलूप तोडून आत पंचांसमक्ष झडती घेतली.
यावेळी संबंधित चोरीस गेलेली दुचाकी या पथकाला आढळून आली़ त्यांनी ही दुचाकी जप्त करुन याबाबत वाशी ठाण्यास तसा अहवाल दिला आहे़ ठाण्यातील डायरीलाही या अहवालाची नोंद करुन घेण्यात आली आहे़ कमलनगर पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी आपल्या सोबत नेली आहे़ ज्या घरात ही दुचाकी आढळून आली ते घर चंद्रसेन जगदेवराव देशमुख यांचे असल्याचे अहवालात म्हटले आहे़ सध्या चंद्रसेन देशमुख हे लातूर जिल्हा पोलीस दलात पोलीस निरीक्षक या हुद्द्यावर असून त्यांच्याकडे जळकोट ठाण्याची जबाबदारी आहे़ अधिकाऱ्याच्याच घरात चोरीचा मुद्देमाल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे़
सहा दिवसांपासून पाळत
कमलगनर पोलिसांना दुचाकी वाशीतील घरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते सहा दिवसांपूर्वीच येथे दाखल झाले होते़ मात्र, घराला कुलूप असल्याने त्यांना शोध घेता आला नाही़ त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी घरावर सहा दिवस पाळत ठेवली. आज न्यायालयाकडून ‘सर्च वारंट’ मिळाल्यानंतर घराचे कुलूप तोडून झडती घेण्यात आली.