उमरग्यात २० लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 07:16 PM2019-07-10T19:16:35+5:302019-07-10T19:20:25+5:30
बुधवारी पहाटे २ वाजता गस्ती वरील पोलिसांची कारवाई
उमरगा : तालुक्यातील येळी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या पथकाने बुधवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास २० लाखांच्या गुटख्यासह टेम्पो पकडला. तसेच चालकासही ताब्यात घेण्यात आले.
उपविभागीय अधिकारी राहुल धस यांचे पथक बुधवारी पहाटे २ वाजता गस्ती घालत होते. पुणे-हैदराबाद मार्गावरून जाणारा टेम्पो येळी गावानजीक आला होता. संशय आल्याने पथकाने टेम्पो थांबवून चालकाकडे चौकशी केली. यावेळी संबंधित चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी टेम्पोतील सामानाची तपासणी केली असता, तब्बल २० लाख रूपये किमतीचा गुटखा आढळून आला. यानंतर पोलिसांनी सदरील गुटख्यासह टेम्पोही ताब्यात घेतला. याबाबत उपविभागीय अधिकारी धस यांच्याशी संपर्क साधला असता, कारवाईबाबत अन्न व भेसळ विभागाला कल्पना देण्यात आली आहे. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई अनुसरण्यात येईल, असे सांगितले.