उंडरगावकरांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:30 AM2021-03-25T04:30:21+5:302021-03-25T04:30:21+5:30

लोहारा : तालुक्यातील उंडरगाव येथील सरपंच, उपसरपंचांचे पद रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे. त्यातच पाणीपुरठ्याचा डीपी जळून ...

Undargaonkars wandering for water | उंडरगावकरांची पाण्यासाठी भटकंती

उंडरगावकरांची पाण्यासाठी भटकंती

googlenewsNext

लोहारा : तालुक्यातील उंडरगाव येथील सरपंच, उपसरपंचांचे पद रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे. त्यातच पाणीपुरठ्याचा डीपी जळून दहा दिवस झाले असून, थकीत वीज बिलासाठी ‘महावितरण’ने याच्या दुरुस्तीस नकार दिल्याने गावकऱ्यांना मागील दहा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोहारा तालुक्यातील उंडरगाव हे दोन हजार लोकसंख्येच गाव. गावाला दोन बोअर व एका विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. दरम्यान, पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर व बोअरला वीज कनेक्शन असलेलला डीपी दहा दिवसांपूर्वी जळाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी ‘महावितरण’ला कळवून डीपी दुरुस्तीची मागणी केली. परंतु, ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठ्याचे अंदाजे साडेसात लाख रुपये वीज बिल थकीत आहे. यामुळे वीज बिल भरा, नंतरच डीपी दुरूस्त करून मिळेल, असा पवित्रा वीज वितरण कंपनीने घेतला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना सध्या शेतशिवारात भटकंती करून पाणी आणावे लागत आहे.

येथील सरपंचपद रिक्त असून, उपसरपंचांनीदेखील तीन महिन्यांपूर्वी राजीनामा दिला आहे. त्यामुळे गावाला कारभारी नाही. असे असताना वीज बिल भरायचे कसे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. सध्या भर उन्हात गावाशेजारील विहिरी, बोअरवरून पाणी आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. सध्या शेतात ज्वारी,गहू काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी खळे करण्यात व्यस्त असतानाच दुसरीकडे गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शेतातील खळे करायचे, की शेतशिवारात फिरून पाणी आणायचे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी लक्ष घालून गावचा वीजपुरवठा सुरळीत करून कृत्रिम पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

जनरेटरचा घेणार आधार

गावाला पाणीपुरवठा करणारी डीपी जळली असून, वीज बिल भरल्याशिवाय दुरुस्ती करणार नाही, असा पवित्रा वीज वितरण कंपनीने घेतला आहे. त्यामुळे ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी मागील दोन दिवस जनरेटरने पाणीपुरवठा सुरू केला होता. यापुढेही चार ते पाच दिवसाआड जनरेटने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोट.........

पाणीपुरवठ्याची डीपी जळाला आहे. तो दुरुस्त करा अशी मागणी वीज वितरण कंपनीकडे केली, तर वीज बिल भरा, मगच डीपी दुरूस्त करू, असे सांगितले जात आहे. परंतु, येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच पदच रिक्त आहे. त्यामुळे पैसे कसे भरणार ?

- गोविंद पाटील, ग्रामसेवक

ग्रामपंचायतच्या खात्यावर पैसे आहेत. त्यामुळे बिलाची रक्कम भरण्यास काहीच आडचण नाही. परंतु, सरपंच, उपसरपंच पदच रिक्त आहे. त्यामुळे निवडी होताच पैसे भरु, असे महावितरणला सांगितले. तरीही डीपी दुरूस्त करण्यास असमर्थता दर्शविली जात आहे.

- महेश ढोबळे,

ग्रामपंचायत सदस्य

गावाला पाणीपुरवठा करणारी डीपी जळून दहा दिवस झाले तरी थकीत वीजबिलामुळे त्याची दुरूस्ती केली जात नाही. हा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. ग्रामस्थांना सध्या घागरभर पाण्यासाठी भरउन्हात रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

- गणेश सूर्यवंशी, ग्रामस्थ

Web Title: Undargaonkars wandering for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.