उस्मानाबाद : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला. आरोग्य, महसूल, पोलीस दल, पालिका कर्मचाऱ्यांची लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली असून, आता १ मार्चपासून ६० वर्षांपुढील ज्येष्ठांना लस टोचण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ८५ हजार ज्येष्ठांना लस मिळणार आहे.
जिल्ह्यात जून - जुलै महिन्यापासून कोरोनाचा फैलाव वेगाने वाढला होता. या आजाराचा सर्वाधिक फटका वयोवृद्ध व्यक्तिंना बसला होता. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिला कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीची प्रतीक्षा होती. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहिमेस प्रत्यक्ष प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, त्यानंतर पोलीस, महसूल विभाग व पालिका कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. आता १ मार्चपासून ६० वर्षांपुढील ज्येष्ठांना लस टोचण्यात येणार आहे. त्यानुषंगाने प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी ॲप्लिकेशनमध्ये काहीअंशी बदल करण्यात येत असून, नागरिकांना घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. त्याकरिता केंद्राची संख्या वाढविली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पॉईंटर...
१३४५७८
६० ते ६९ वयोगटातील नागरिक
८९१३२
७० ते ७९ वयोगटातील नागरिक
४८२८६
८० ते ८९ वयोगटातील नागरिक
१३१६८
९० पेक्षा जास्त वय असलेले नागरिक
कुठल्या तालुक्यात किती केंद्र
उस्मानाबाद २
कळंब १
तुळजापूर १
भूम १
परंडा १
वाशी १
लोहारा १
उमरगा १
१४२६ नागरिकांचे वय शंभरीपार
जिल्ह्यात १ मार्चपासून ६० वयोगटातील पुढील २ लाख ८५ हजार १६४ ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यात १ हजार ४२६ नागरिकांचे वय शंभरीपार आहे. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी अडचणी येऊ नये, यासाठी कोविन ॲपमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. या ॲपवर नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर लस घेता येणार आहे.
प्रतिक्रिया...
६० वयानंतर अनेकांना विविध आजार जडत असतात. त्यामुळे नेहमीच आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. कोविडसारख्या आजाराशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती महत्त्वाची ठरते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी लस घेणार आहे.
दिलीप हतवळणे
ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांनी ग्रासलेले असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे ही लस घेणार आहे. त्याकरिता कोविन ॲपवर नाव नोंदविणार आहे.
शिरीष शितोळे