Valentine Day : डॉक्टर दाम्पत्याची व्यसनमुक्ती मोहीम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:16 PM2019-02-14T13:16:20+5:302019-02-14T13:19:39+5:30
डॉ. संदीप माणिकराव तांबारे व डॉ. पल्लवी संदीप तांबारे हे मूळचे आंदोरा (ता. कळंब) येथील दाम्पत्य़ वैद्यकीय व्यवसायासाठी २००८ मध्ये येरमाळा येथे स्थिरावले.
- बालाजी अडसूळ
कळंब (जि़उस्मानाबाद) : व्यसनामुळे केवळ एक व्यक्ती नव्हे तर त्याच्या तीन पिढ्यांची बरबादी होते, हे वैद्यकीय सेवा करताना लक्षात आलेल्या तांबारे डॉक्टर दाम्पत्याने व्यसनमुक्तीच्या कार्याला वाहून घेतले़ गेली नऊ वर्षे त्यांनी अविरत परिश्रम घेऊन तब्बल १८ हजारांवर व्यक्तींची व्यसनातून सुटका करतानाच त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलविण्याचे कार्य केले आहे़
डॉ. संदीप माणिकराव तांबारे व डॉ. पल्लवी संदीप तांबारे हे मूळचे आंदोरा (ता. कळंब) येथील दाम्पत्य़ वैद्यकीय व्यवसायासाठी २००८ मध्ये येरमाळा येथे स्थिरावले. वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवितानाच त्यांना आपल्याकडे आलेले बहुतांश रूग्ण व्यसनाच्या आहारी गेले असल्याचे व त्यांच्या आजाराचे मूळ हे व्यसनात दडल्याचे डॉ. तांबारे यांच्या निदर्शनास आले. यामुळे समाजभान जागृत असलेल्या तांबारे दाम्पत्याने व्यसनमुक्तीच्या कार्यात झोकून देण्याचा निर्णय सुमारे नऊ वर्षांपूर्वी घेतला़ येरमाळा येथेच त्यांनी व्यसनमुक्तीसंदर्भात संशोधन सुरु केले़ यातून पुढे आलेल्या उपचारपद्धतींचा अवलंब करुन डॉ़संदीप व डॉ़पल्लवी यांनी मोठी झेप घेतली़
व्यसनी व्यक्तीवर मानसोपचार, योगोपचार, औषधोपचार, समुपदेशन, संगीतोपचार या सर्व बहुसूत्री उपचार पद्धतीचा अवलंब करून व्यसनमुक्तीचा धडा हे दाम्पत्य देत आले आहे़ इतक्यावरच न थांबता या व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी त्यांच्या पुनर्वसनाचे व्रतही त्यांनी हाती घेतले़ आजवर १८ हजारांवर व्यक्तींची व्यसनमुक्ती केल्यानंतर त्यातील ९६८ जणांचे पुनर्वसन केले आहे़ या दाम्पत्याचे हे कार्य राज्यभर व्यापले आहे़
व्यसनमुक्तीची दिंडी
एखाद्या गावात व्यसनाधीनतेने कळस गाठल्याचे कळताच हे दोघेही व्यसनमुक्तीची दिंडी घेऊन तेथे हमखास पोहोचतात़ गृहभेटी देऊन जनजागृती साहित्य वाटप केले जाते़ प्रोजेक्टरद्वारे चित्रफिती दाखवून व्यसनापासून नागरिकांना परावृत्त करण्याचे कार्य केले जाते़ व्यसनामुळे नातेसंबंधांत निर्माण झालेला दुरावा दूर करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे़ कौटुंबिक समुपदेशनाचा मार्ग वापरुन त्यांनी शेकडो कुटुंबांची संसारवेल पुन्हा फुलविली आहे़