कळंब : विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या काळाच्या ओघात दुर्मीळ होत चालल्या आहेत. शरीराला निरोगी ठेवणारा हा आरोग्यवर्धक रानमेवा जपण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यात शेत शिवारातील बांधाकुंदावर, उभ्या पिकांत तसेच जंगलात विविध भाज्या, वनस्पती नैसर्गिकरीत्या उगवतात. रानभाज्या म्हणून संबोधला जाणारा हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. शरीराच्या नानाविध तक्रारींवर गुणकारी ‘मात्रा’ म्हणून या चविष्ट व आरोग्यदायी रानभाज्या कामी येतात.
या रानभाज्या आपणास ठाऊक आहेत का?
पाथरी
पाल्याच्या स्वरूपात भरपूर प्रथिने व जीवनसत्वे असलेली पाथरीची भाजी गुणाने शीतल, रेचक आहे. याचे सेवन अपचन, त्वचारोग, कंबरदुखी, कावीळ, यकृत यासाठी फायदेशीर आहे.
तांदुळजा
शेतातील बारमाही तण असलेली तांदुळजा किंवा तांदुळकुंज्रा ही सहज उपलब्ध होणारी रानभाजी आहे. याच्या कोवळ्या पानाची भाजी मधुर असून उष्णता, ताप, पोटविकार व दाह यासाठी गुणकारी आहे.
घोळ
याच्या पान, देठाच्या भाजीचा स्वाद जितका खमंग तितकीच ती जीवनसत्व, लोह, तांब, क्षार, तंतूमय असलेली भाजी. यामुळे कर्करोग, रक्तदाब, लकवा, यकृतासाठी फायदेशीर असते.
अंबाडी
पानाच्या स्वरूपात कांद्यासोबत आवडीने खाल्ली जाणारी ही भाजी चवीस आंबटगोड अशीच. रोगप्रतिकारशक्तीवर्धक अंबाडीत लोह, जीवनसत्व अ आणि क, फोलेट, झिंक असे अँटी ऑक्सिडंट असतात.
चंदन बटवा
चंदन बटवा ही एक पानाच्या स्वरूपात उपलब्ध होणारी प्रमुख रानभाजी आहे. कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर असलेली ही भाजी अपचन, बद्धकोष्ठता यासाठी गुणकारी आहे.
या रानभाज्या झाल्या गायब...
तरवटाची भाजी विस्मृतीत
या भागात तरवट म्हणून आढळणारी भाजी आता दुर्मीळ झाली आहे. भुईमूग, मेथीसारखी पाने व लहान पिवळी फुले असलेली ही भाजी संधीवात, स्नायुदुखी अशा विविध आजारांसाठी बहुगुणी आहे. अशी हा रानभाजीची आता केवळ आठवण राहिली आहे.
चिलाची चव कुठे चाखावी?
ग्रामीण भागातील चिलाची भाजी काळाच्या ओघात लुप्त झाली आहे. वात, पित्त व कफ या त्रिदोषाला शांत करणारी ही पालेभाजी पाहावयास मिळत नाही.
तज्ज्ञाचा कोट
शक्तिवर्धक रानभाज्या
शेत शिवारात निसर्गतः येणाऱ्या रानभाज्या या आरोग्यदायी असतात. त्यांच्या उपलब्धतेसाठी ना बियाण्यांची, खतांची गरज असते ना मशागतीची. आपोआप येणाऱ्या या भाज्या चविष्ट तर असतात शिवाय खनिजांची पूर्तता करणाऱ्या असतात. तंतूमय असल्याने अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतात. यातील प्रत्येक भाजीचे स्वतंत्र औषधी गुणधर्म असल्याने चयापचय क्रिया सुरळीत होते.