परंड्यातील रस्त्यांची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:30 AM2021-03-24T04:30:26+5:302021-03-24T04:30:26+5:30
परंडा : शहरातील न्यायालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते बसस्थानक रस्ता खड्डेमय झाला असून, विश्वसिद्धी काॅम्प्लेक्ससमोर तर ...
परंडा : शहरातील न्यायालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते बसस्थानक रस्ता खड्डेमय झाला असून, विश्वसिद्धी काॅम्प्लेक्ससमोर तर भला मोठा खड्डा पडल्याने त्यात वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
गेल्या चार वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आली. मात्र, सर्वाधिक वाहतूक असलेल्या न्यायालय ते बसस्थानक या मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्ता कामासाठी व रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची जुनी झाडे गेल्या महिन्यात तोडण्यात आली आहेत. तसेच मधोमध असलेल्या वीज वाहक खांबावरील ताराही नवीन उभारलेल्या खांबावर हटविण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम चालू करण्यात आलेले नाही. दिवसभरात या रस्त्यावरुन हजारो वाहने व राज्य परिवहन मंडळाच्या शेकडो बसेस धावतात. बसमधील प्रवाशांना शेकडो कि. मी. अंतर प्रवास करताना त्रास होत नाही. परंतु, न्यायालय ते बसस्थानक या दीड कि. मी. अंतराच्या शहरातील या मुख्य रस्त्यावरून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तशातच गेल्या १५ दिवसांपासून सीना नदी व वडनेर, देवगाव येथील उल्का नदीतून वाळू उपसा सुरू झाल्याने वाळूने ओव्हरलोड भरलेले ट्रॅक्टर, ट्रक व हायवा वाहने या रस्त्यावरुन जात असल्याने खड्डे मोठे व संख्येने वाढले आहेत. न्यायालय ते गोल्डन चाैकदरम्यान शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर १५ दिवसांपासून भला मोठा खड्डा पडला असून, त्यामध्ये वाहने अडकून पडत आहेत. तशातच गेल्या तीन दिवसांत अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने या खड्ड्याने नालीचे स्वरूप धारण केले आहे. पावसामुळे झालेल्या चिखलात मंगळवारी येथे वाहने फसून अडकत होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरून ‘ओव्हरलोड’ वाळूची वाहतूक करणारी वाहने बंद करावीत व तातडीने या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.