चोरीच्या गुन्ह्यातील वाँटेड जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:33 AM2021-02-20T05:33:08+5:302021-02-20T05:33:08+5:30
पळसप येथील आरोपी रवी पवार यांच्याविरुध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठण्यात २०१९ मध्ये चोरीचा गुन्हा नोंद आहे. मात्र, तो पोलिसांच्या ...
पळसप येथील आरोपी रवी पवार यांच्याविरुध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठण्यात २०१९ मध्ये चोरीचा गुन्हा नोंद आहे. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता, १८ फेब्रुवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे पवार यास पळसप येथून ताब्यात घेतले. ही कारवाई पोहेकॉ किशोर रोकडे, पोना समाधान वाघमारे यांनी केली.
३९७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
उस्मानाबाद : वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना शिस्त लागावी, यासाठी जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. बुधवारी जिल्ह्यातील विविध मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३९७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या वाहनचालकांकडून ९५ हजार ८०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
मोहा येथे दारु अड्ड्यावर धाड
उस्मानाबाद : कळंब पोलीस ठाण्याच्या पथकाने मोहा येथील एका दारु अड्ड्यावर १७ फेब्रुवारी रोजी धाड टाकली. यात मोहा येथील नारायण मडके याच्याजवळ देशी दारुच्या ८ बाटल्या आढळून आल्या. पोलिस पथकाने मद्य जप्त करुन संबंधिताविरुध्द गुन्हा नोंद केला.
जुगार अड्ड्यावर छापा, एकाविरुध्द गुन्हा
उस्मानाबाद : तालुक्यातील तेर येथील एका जुगार अड्ड्यावर ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने १७ फेब्रुवारी रोजी छापा टाकला. यात तेर येथील अविनाश शिंदे याच्याजवळ कल्याण मटका जुगार साहित्य व ४०० रुपये आढळून आले. पोलिसांनी जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन संबंधिताविरुध्द ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
भूखंड वाटणीच्या कारणावरुन एकास मारहाण
उस्मानाबाद : भूखंड वाटणीच्या कारणावरुन एकास एकाने बेदम मारहाण केली. ही घटना कळंब तालुक्यातील रायगव्हाण येथे १७ फेब्रुवारी रोजी घडली.
रायगव्हाण येथील प्रभाकर गिराम हे आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी गल्लीतीलच अनुरथ गिराम यांनी तेथे येऊन भूखंड वाटणीच्या कारणावरुन प्रभाकर गिराम यांना शिवीगाळ करुन विटाने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रभाकर गिराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.