शिक्षकाची बदली झाल्याचे कळताच विद्यार्थिनींनी फोडला टाहो तर पालकांनी ठोकले शाळेला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:39 PM2018-01-25T15:39:30+5:302018-01-25T15:45:05+5:30
बेंबळी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील शिक्षक भालचंद्र कोकाटे यांची बदली झाली आहे. कोकाटे यांना परत याच शाळेत आणावे या मागणीसाठी लहान मुलींनी शाळेत आज एकच टाहो फोडला.
उस्मानाबाद : तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेतील शिक्षक भालचंद्र कोकाटे यांची बदली झाली आहे. कोकाटे यांना परत याच शाळेत आणावे या मागणीसाठी विद्यार्थिनीनी शाळेत आज एकच टाहो फोडला. तर संतप्त पालकांनी दिवसभर शाळेत ठाण मांडून वार्षिक परीक्षा होईपर्यंत कोकाटे यांना शाळेवर घ्यावे अशी मागणी करून शाळा बंद केली.
बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक भालचंद्र कोकाटे यांची समायोजनातून बदली होणार असल्याचे समजल्यानंतर पालक व शालेय व्यवस्थापन समितिने त्यांची बदली करू नये अशी मागणी केली होती. मात्र, शिक्षण विभागाने कोकाटे यांची बदली केली. कोकाटे यांची बदली झाल्याचे समजताच विद्यार्थिनीना अश्रू अनावर झाले.
दुसरीकडे प्रशासनाने बदली न करण्याच्या निवेदनाची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या महिला पालकांनी शाळेला टाळे ठोकले. केंद्रप्रमुख शिंदे आल्यानंतर कुलूप उघडण्यात आले. मात्र, दिवसभर शाळेचे काम बंद होते. विद्यार्थिनीनी शिंदे यांना घेराव घालून कोकाटे सरांना परत शाळेत आणण्याची मागणी लावली. दरम्यान, प्रशासन मागणी मान्य करत नाही तोपर्यंत शाळा भरू देणार नसल्याचा इशारा शालेय शिक्षण समिती अध्यक्षा शोभा गायकवाड यांनी दिला आहे. वार्षिक परीक्षा होईपर्यंत कोकाटे यांना परत आणावे, शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच मागणी मान्य नाही झाली तर विद्यार्थिनींची सामुहिक टीसी काढण्याचा इशारा त्यांनी दिला.