तेर (जि.उस्मानाबाद) : राज्य सरकारचे मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष आहे. आमच्या काळात एकेका जिल्ह्याला ८०० कोटींपर्यंत पीकविमा मिळाला होता. आता सबंध महाराष्ट्रात ८०० कोटी मिळत नाहीयेत. नुकसानीमुळे शेतकरी आक्रोश करीत आहेत. तेव्हा विमा कंपन्यांची कार्यालये फोडणारे आता सत्तेत असतानाही गप्प का आहेत, असा निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सेनेचा नामोल्लेख टाळून साधला.
विरोधी पक्षनेते फडणवीस, प्रवीण दरेकर हे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. सायंकाळी त्यांनी तेर येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पाहणीदरम्यान खूप भीषण स्थिती दिसून आली. मराठवाड्यातील सुमारे २५ लाख हेक्टर्सहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. नजर आणेवारीत ८० ते १०० टक्के नुकसान दिसून येत आहे. अशावेळी विमा कंपन्यांचे दहावी नापास प्रतिनिधी शेतकऱ्यांकडे नुकसान दाखविण्यासाठी ५०० रुपये मागत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आपल्याकडे केल्या. शेतकऱ्यांचे पैसे न देण्यासाठी कंपन्या सरसकट पंचनाम्याचा आग्रह धरीत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने विमा कंपन्यांशी बोलून तातडीने विमा मिळवून देणे गरजेचे आहे. मात्र, हे सरकार केवळ जबाबादारी ढकलण्याचे काम करीत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्यक्षात घेता येणार तुळजाभवानी मातेचे दर्शन; दररोज १५ हजार भाविकांना मिळणार मंदिरात प्रवेश
अंग झटकू नका, केंद्राने ११ हजार कोटी दिले...प्रत्येकवेळी राज्य सरकार केंद्रावर ढकलून अंग झटकून मोकळे होण्याचा प्रयत्न करीत आहे. २००४ ते २०१४ या काळात राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीत मदत देण्यासाठी २० हजार कोटी मागितले होते. त्याबदल्यात दहा वर्षांत ३ हजार ६०० कोटी राज्याला मिळाले. यानंतर ७ वर्षांच्याच काळात राज्याने अशा परिस्थितीत २५ हजार कोटी केंद्राकडे मागितले. केंद्राने ११ हजार कोटी रुपये दिलेत. त्यामुळे कारण सांगणे, राजकारण करणे बंद करा व तातडीने मदत द्यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.