- स्नेहा मोरे
संत गोरोबाकाका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहू नका अशा आशयाचा फोन ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना आला होता. मात्र, निडरपणे महानोर यांनी शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थिती दर्शविली.ते म्हणाले, संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठीची सेवा केली आहे़ माझे त्यांना समर्थन आहे़ त्यांना विरोध कशासाठी, असे ठणकावून सांगत मंचावर महानोरच उभे आहेत, माझं भूत नाही, असा टोलाही लगावला. संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांच्याविषयी झालेल्या वादाचा खरपूस समाचार घेत मराठी साहित्य क्षेत्रातील दिब्रिटो यांचे योगदान महानोरांनी विस्ताराने अधोरेखित केले. ते म्हणाले, साहित्यिकाला कोणताही जात-धर्म नसतो. उच्च साहित्य हीच साहित्यिकाची जात असते. त्यामुळे मराठी भाषा साहित्यासाठी दिब्रिटो करत असलेले काम हे जाती-धर्माच्या पलीकडे आहे. यावेळी महानोर यांनी मराठवाड्याने घडविलेल्या साहित्यिकांच्या प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार गेल्या आठ वर्षात मराठवाड्यातील तीन साहित्यिकांना मिळाला याचा अभिमान आहे. साहित्य-कला क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिभावान मंडळी औरंगाबाद आणि मराठवाड्यातील असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल हे सुद्धा मराठवाड्याचे पुत्र असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.साहित्यिकांच्या मंचावर राजकारणी असावेत का, यावर ते म्हणाले, यशवंतराव चव्हाणांनी समोरच्या रांगेत बसून, रसिक म्हणून संमेलनास हजेरी लावली आहे़ ही आपली परंपरा आहे़ त्याची प्रचिती आज येथे येत आहे़ दरम्यान, ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दाही महानोर यांनी मांडला़ घरातील पुस्तकांचे कपाट म्हणजे दुसरे देवघर असते, असेही ते म्हणाले़
हे तर पुरोगामी महाराष्ट्राचे अपयशअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणाºया गळचेपीवर भाष्य करताना महानोर म्हणाले, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा उलगडा अजूनही झालेला नाही, हा शोध जलद गतीने व्हावा यासाठी आग्रही असणाºया व्यक्तींना यंत्रणा देशद्रोही ठरवते हा महाराष्ट्राचा करंटेपणा आहे. अभिव्यक्त होत असलेली माणसं अशी जात असतील तर हे पुरोगामी महाराष्ट्राचे अपयश आहे.