झोपडपट्टीतील रहिवाशांची गैरसोय
तामलवाडी : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर सांगवी (काटी) झोपडपट्टी येथे नागरिकांना ये-जा करण्यासाठी लोखंडी शिडी उभारणीचे काम वर्षभरापासून खोळंबले आहे. यामुळे रहिवाशांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण झाल्यानंतर झोपडपट्टी येथील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी येथे भुयारी मार्गाची सोय कंपनीकडून करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आंदोलन केले. यानंतर या ठिकाणी लोखंडी शिडी उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने मंजुरी दिली. त्या कामाचा ठेकाही दिला गेला. यानंतर ठेकेदाराने झोपडपट्टी भागात मोजमाप घेऊन खोदकाम करून शिडीसाठी सिमेंटचे चबुतरेदेखील तयार केले. यानंतर पुढे कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मागील वर्षभरापासून हे भिजत घोंगडे कायम आहे.
शिडी नसल्याने सध्या येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करावी लागत आहे. यामुळे भरधाव वेगाने वाहणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, तसेच महामार्गाच्या पूर्व बाजूस जिल्हा परिषद शाळा, एक राष्ट्रीय बँक असून, ग्राहक व विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदारास सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
चौकट
गुरुजींवर जबाबदारी
सांगवी (काटी) झोपडपट्टी जिल्हा परिषद शाळेत २६ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. कोरोना संसर्गापासून शाळा बंद होत्या; मात्र आता वेगवेगळ्या वारादिवशी वेगवेगळे वर्ग असे नियोजन करून काही वर्ग सुरू करण्यात आले आहेत; परंतु महामार्ग धोकादायक बनल्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी शिक्षकांनाच काळजी घ्यावी लागत आहे.
कोट....
अपघाताचा धोका ओळखून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी भागात शिडी उभारण्यास मंजुरी दिली. यासाठी संबंधित कंत्राटदाराने चबुतऱ्यांची उभारणीही केली; परंतु यानंतरचे काम नेमके कशामुळे थांबले, हे काही समजत नाही. शिडी नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागत आहे. त्यामुळे हे काम लवकर मार्गी लावावे.
- मारूती मगर, रहिवाशी.
शाळा, बँक हे महामार्गाच्या पूर्व बाजूस असून, झोपडपट्टी पश्चिम बाजूला आहे. येथील रहिवाशी, विद्यार्थ्यांना नेहमीच महामार्ग ओलांडून ये-जा करावी लागते; परंतु शिडीचे काम रखडले असून, वारंवार पाठपुरावा करूनही याकडे महामार्ग विभागाचे अधिकारी किंवा ठेकेदार लक्ष द्यायला तयार नाहीत.
- ललिता मगर,
सरपंच,
सांगवी (काटी)