तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) - पांगरदरवाडी गावाला जोडणाऱ्या भूमिगत पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सांगवी-माळुंब्रा साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर या दोन्ही गावचा संपर्क तुटतो. दोन्ही गावचा संपर्क तुटल्यानंतर ग्रामस्थांना वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यातही हा पूल १५ दिवस पाण्याखाली जाऊन दोन्ही गावचा संपर्क तुटला होता. याच पुलावरून सांगवी, पांगरदरवाडी या दोन गावची वाहतूक होते. गावकऱ्यांना वाहतुकीसाठी दुसरा मार्ग नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. गतवर्षी १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत ओढ्याचे पाणी गावात शिरले होते. त्यामुळे हा पूल १५ दिवस पाण्याखाली गेल्याने पाण्यातून वाट शोधतच गावकरी ये-जा करीत होते. शिवाय, एक जीप पुराच्या पाण्यातून पुलावरून वाहून गेली होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.
गेल्या ३० वर्षांपासून या पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करण्याची मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थांमधून संबंधित विभागाकडे केली जात आहे. मात्र, संबंधित विभागाकडून सदर मागणीला केराची टोपली दाखविली जात आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात तरी या पुलाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा दोन्ही गावातील ग्रामस्थांना होती; मात्र पावसाळ्यानंतर सहा महिने उलटले तरी पुलाच्या बांधकामाबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पावसाळा सुरू होण्यास अवघे तीन महिने अवधी असताना पुलाच्या कामाचा श्रीगणेशा अद्यापही झालेला नाही किंवा निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी सांगवी, पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.
पुलाच्या कामाबाबत आ. पाटील यांना साकडे
ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगवी गावानजीकच्या पुलाची भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी गावकऱ्यांनी सदर पुलाचे नव्याने बांधकाम करून उंची वाढविण्याबाबत साकडे घातले होते. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
२५ वर्षांत रस्त्याची दुरुस्ती नाही
सांगवी ते पांगरदरवाडी या पाच किमी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रोडवर डांबर उरले नाही. अडीच फूट खड्ड्यातून वाट शोधत दोन गावच्या ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. गेल्या २५ वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.