- चेतन धनुरे
उस्मानाबाद : युती होऊ नये, यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या भाजप इच्छुकांची आता चांगलीच पंचाईत झाली आहे़ काही दिवसांपूर्वीपर्यंत युती होणारच नाही, असे चित्र होते़ मात्र, युतीला मूर्त स्वरुप मिळत असल्याने भाजपमधील लोकसभा व विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे़
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा युतीत शिवसेनेकडे आहे़ तर चार विधानसभा मतदारसंघापैकी तुळजापूर वगळता उर्वरित तीनही मतदारसंघ सेनेकडेच आहेत़ भाजप व सेनेमधील वरकरणी दिसणारा दुरावा लक्षात घेऊन आगामी निवडणुका हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील, अशी आशा लोकसभा व विधानसभा लढवू इच्छिणाऱ्यांना लागून होती़ अगदी अलिकडच्या काळात तर सेनेकडून भाजपवर होत असलेले शाब्दिक हल्ले अन् अमित शहांनी ‘पटक देंगे’ अशी सेनेवर केलेली कोटी, भाजप इच्छुकांना गुदगुल्या करीत होत्या़ मात्र, युती पूर्णत्वाकडे जात असताना गुदगुल्या करणारी ‘ती’ बोटं आता पोटातच शिरल्याचा भास या इच्छुकांना होत असावा़ सेना-भाजपमधील ‘पटकापटकी’च्या भाषेने उंचावलेल्या आशा सोमवारचा दिवस मावळतीला गेला तशा त्याही जवळपास मावळल्या़
उस्मानाबाद जिल्ह्यात भाजपची ताकद नगण्य होती़ मात्र, २०१४ मध्ये राज्य व केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपने आपली ताकद वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न केले़ त्यातूनच ठिकठिकाणी बडे मासे गळाला लावण्यात भाजपला यशही आले़ मात्र, यातून अनेकांच्या महत्वाकांक्षा वाढीस लागल्या़ त्यास भाजप-सेनेतील बेबनावाने आणखी बळ पुरविले़ परिणामी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच पक्षात आलेले डॉ़प्रतापसिंह पाटील यांच्यासोबतच सुधीर पाटील, बार्शीचे राजेंद्र मिरगणे यांच्यासह अनेकांनी दंड थोपटायला सुरुवात केली होती़ मात्र, युतीचा निर्णय या इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरणारे ठरले़ नाही म्हणायला, अपक्ष लढण्याचा पर्याय त्यांच्यापुढे आहेच
अशीच काहिशी स्थिती विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांच्या बाबतीतही आहे़ तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा एकमेव भाजपच्या वाट्याला आहे़ उर्वरीत तीन मतदारसंघ युतीत सेनेकडे आहेत़ यात फारसे फेरबदल संभवत नाहीत़ असे झाले तर उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातून तयारीत असलेल्या व अलिकडेच भाजपात आलेल्या सुरेश पाटील यांच्यासह इतर इच्छुकांचीही पंचाईत होणार आहे़ तरीही सुरेश पाटलांनी अपक्ष लढण्याचीही तयारी असल्याचे मागेच जाहीर केले आहे़ भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून भूम पालिकेचे गटनेते संजय गाढवे यांना पक्षात आणण्यात भाजपने यश मिळविले़ त्यांनी स्वत:हून विधानसभा लढण्याचे जाहीर केले नसले तरी, त्यांच्या समर्थकांनी महत्वाकांक्षा वाढवून ठेवली होती़ उमरग्यातून कैलास शिंदे यांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली होती़ मागच्या टर्मला युती नसताना त्यांनी भाजपाकडून लढून ३५ हजारांवर मतेही मिळविली होती़ विधानसभा निवडणुकीपर्यंत युती अभेद्य राहिली तर, भाजपमधील अनेक इच्छुकांच्या गुडघ्याचे बाशिंग गळून पडणार आहे.