उस्मानाबाद : आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या ज्येष्ठतेचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. ही बाब समोर आल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी जिल्हाभरातील सुमारे अडीचशेवर शिक्षकांची ज्येष्ठता बदलून गुढीपाडवा गोड केला.
जिल्हा परिषदेत आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या ज्येष्ठता बदलीचा मुद्दा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. शिक्षक संघटनांनी या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, सदरील प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम होते. ही बाब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी कार्यवाहीचे आदेश शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहिरे यांना दिले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही बाब जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनीही ही प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला थोडेथोडके नव्हे तर तब्बल २५२ शिक्षकांच्या ज्येष्ठता बदलीचा आदेश काढला आहे. हे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फड यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली काढून जिल्हा परिषदेने शिक्षकांना गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. याबद्दल शिक्षकांतून समाधान व्यक्त केले जाऊ लागले आहे.
चौकट...
१९८२ मधील शिक्षकांनाही न्याय...
जिल्हा परिषदेत अनेक शिक्षक १९८२ साली आपसी आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आले आहेत. तेव्हापासून ज्येष्ठता बदलीचा प्रश्न प्रलंबित होता. सोमवारी झालेल्या प्रक्रियेत याही शिक्षकांना न्याय मिळाला आहे.
५२ जणांना दिले त्रुटीचे पत्र...
ज्येष्ठता बदलीसाठी सुमारे ३०४ शिक्षक पात्र होते. परंतु, यातील ५२ शिक्षकांच्या प्रस्तावात त्रुटी निघाल्या होत्या. तसे पत्र त्यांना देण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून संगण्यात आले.
कोट...
शिक्षकांच्या ज्येष्ठता बदलीचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित होता. तो सोमवारी आपण मार्गी लावला आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना बदल्यांसह इतर लाभ घेता येणार आहेत. ही त्यांच्यासाठी गुढीपाडव्याची गोड भेट मानायला हवी.
-डॉ. विजयकुमार फड, सीईओ, जिल्हा परिषद.
ज्येष्ठता बदलीच्या अनुषंगाने शिक्षकांनी माझी भेट घेतली होती. या अनुषंगाने शिक्षण विभागाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रक्रिया राबवून सदरील प्रश्न निकाली काढण्यात आला आहे.
-धनंजय सावंत, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.