धुळे जिल्हा परिषदेत २१७ पद रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:27 AM2019-03-12T11:27:55+5:302019-03-12T11:29:16+5:30
कामकाजावरवर होतो परिणाम : गेल्या ३-४ वर्षांपासून नवीन पदाची भरती करण्यात आलेली नाही
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून परिचित असलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत मुख्यालय व तालुकास्तरावर मिळून थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २१७ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक पदे ही आरोग्य विभागातील रिक्त आहे. अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागला आहे. ही पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होऊ लागली आहे.
जिल्हा परिषदेचा ग्रामीण विभागाशी संपर्क येत असतो. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियान राबविण्यात जिल्हा परिषद अग्रेसर असते. याचबरोबर ग्रामीण पातळीवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना पोहचविणे, त्याची योग्यपद्धतीने अमलबजावणी करणे याची जबाबदारी जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन विभागावरच येत असते. त्यासाठी या दोन्ही विभागात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गरज असते.
मात्र धुळे जिल्हा परिषद अंतर्गत गेल्या ३-४ वर्षांपासून विविध विभागातील पदे भरण्यात आलेली नाही.त्यामुळे रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर एकूण साडेपाच ते सहा हजार कर्मचारी आहेत. यात जवळपास ३ हजार कर्मचारी हे प्राथमिक शिक्षक आहे.
जिल्हा परिषदेत मुख्यालय व तालुकास्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची २१७ पदे रिक्त आहेत. यात बांधकाम, लघुसिंचन, व पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्याची सात पदे रिक्त आहेत. तर आरोग्य विभागात आरोग्य सेवक , हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची १४७, स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सहायकाची ४३, पशुधन पर्यवेक्षकाची ६, वरिष्ठ लिपिकाची ३, अंगणवाडी पर्यवेक्षकांची ५, व विस्तार अधिकारीची (सांखिकी) ६ पदे रिक्त आहेत.
कामकाजावर परिणाम
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम थेट कामकाजावर होऊ लागला आहे. आरोग्य विभागात सर्वात जास्त पदे रिक्त असल्याने, त्याचा परिणाम ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यावर होत असल्याचे बोलले जात आहे. कर्मचारी नसल्याने,फवारणीची कामेही होत नाही.
प्रस्ताव पाठवूनही उपयोग नाही
रिक्त पदांबाबत दर चार-पाच महिन्यानंतर शासनाकडे प्रस्ताव पाठविला जात असतो. मात्र त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर तरी शाससाने जिल्हा परिषद अंतर्गत असलेली रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.