पटेल परिवाराकडून मृतांच्या वारसांना ६० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:04 PM2019-09-01T23:04:14+5:302019-09-01T23:04:38+5:30
शिरपूर : मृत व जखमींच्या कुटुंबांना ३ महिन्यांचा किराणा माल भरुन देणार
शिरपूर : तालुक्यातील वाघाडी येथील केमिकल्स फॅक्टरीच्या स्फोटात १३ ठार तर ७२ जण जखमी झाले आहेत़ धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या जखमींची भेट घेवून आमदार अमरिशभाई पटेल यांनी मृतांना प्रत्येकी ५० हजार व उद्योगपती तपनभाई पटेल यांनी १० हजार असे ६० हजार रूपयांची मदत पटेल परिवाराकडून जाहिर करून मृत व जखमींच्या परिवाराला ३ महिने पुरेल एवढा किराणा माल देण्याचे जाहिर केले़
घटनेचे वृत्त आमदार अमरिशभाई पटेल यांना समजल्यावर त्यांनी तातडीने शासकीय अधिकाºयांशी संपर्क साधून मदत कार्य करण्याचे कळविले़ त्यांनीही १ रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींची आस्थेवाईक चौकशी केली़ २ रोजी सकाळी १० वाजता येथील नपाच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल व उपजिल्हा रूग्णालयातील जखमींना भेट घेवून घटनेसंदर्भात माहिती जाणून घेणार आहेत़ त्यानंतर घटनास्थळी भेट देणार आहेत़
या घटनेत मृत पावलेल्या १३ जणांना प्रत्येकी पटेल परिवाराकडून ५० हजार रूपये दिले जाणार आहेत़ तसेच यापूर्वी उद्योगपती तपनभाई पटेल यांनी मृतांना प्रत्येकी १० हजार रूपये देण्याचे जाहिर केले आहे़ तसेच मृत व जखमींच्या परिवाराला ३ महिने पुरेल एवढा किराणा माल व धान्याचा साठा पुरविणार आहेत़ या घटनेत २ मुले अनाथ झाले आहेत़ याशिवाय अजून काही मुले अनाथ झाले असतील असे सर्वांचे शिक्षण, कपडे, राहण्याची व जेवणाची सोय असा सर्व खर्च पटेल परिवाराकडून केला जाणार आहे़
आमदार अमरिशभाई पटेल यांनी सांगितले की, सदरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे़ तालुक्याने अशी धकादायक घटना कधी बघितली नव्हती़ मृत व जखमींना सर्वातोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले़
तसेच संबंधित कंपनीने मृत व जखमींना मदत केली नाही तर ते कोर्टात जाण्यासाठी लागणारा सर्व खर्च पटेल परिवाराकडून केला जाणार असल्याचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले़
उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी देखील जिल्हा रूग्णालयासह येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींची भेट घेवून घटनास्थळाची पहाणी केली़