धुळे : न्यायालयीन कामकाजात सामाजिक कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढत आहे़ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शासनाकडे केलेल्या तक्रारीमुळे अॅड़ अमोल सावंत यांना राजीनामा द्यावा लागला़ यामुळे धुळे बार असोसिएशनने बैठक घेऊन अण्णा हजारे यांच्या हस्तक्षेप संदर्भातील निषेधाचा ठराव सोमवारी पारीत केला़ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात जळगाव घरकूल प्रकरणी अॅड़ अमोल सावंत यांची शासनाने सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती़ नियुक्तीनंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अॅड़ अमोल सावंत यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी करत शासनाकडे खोट्या तक्रारी केल्या़ त्याची दखल घेऊन शासनाने केलेली नियुक्ती रद्द करण्याअगोदरच अॅड़ अमोल सावंत यांनी सरकारी वकील पदाचा राजीनामा देऊन टाकला़ या अनुषंगाने धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बार रुममध्ये बैठक घेण्यात आली़ यावेळी अॅड़ अमोल सावंत, अॅड़ जितेंद्र निळे, अॅड़ बी़ पी़ पवार, अॅड़ कुंदन पवार, अॅड़ समीर पंडीत, अॅड़ एम़ एस़ पाटील, अॅड़ विवेक सूर्यवंशी, अॅड़ सुरेश बच्छाव, अॅड़ राहूल भामरे, अॅड़ साबद्रा यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते़
न्यायालयीन प्रक्रियेत सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढत असलेला हस्तक्षेप चुकीचा असून वकीलांच्या अधिकारांवर एक प्रकारे गदा आणणारा आहे़ यासंदर्भात महाराष्ट्र बार असोसिएशनकडे पत्र पाठविले जाईल़ - अॅड़ दिलीप पाटीलअध्यक्ष, धुळे बार असोसिएशन