धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आरक्षण देण्याची घोषणा केली. पण सर्व्हे केल्यानंतर दहा वर्षांनी महिलांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मात्र काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास कुठलाही सर्व्हे न करता महिलांना ५० टक्के आरक्षण देईल अशी घोषणा काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी महिला परिषदेत केली. यावेळी त्यांनी महिलांना न्याय देण्यासाठी पाच महत्वपूर्ण घोषणा करीत आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजविला.
खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी धुळ्यात आली होती. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला न्याय हक्क परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. सुरत बायपासवरील एका हॉटेलच्या मैदानावर झालेल्या या परिषदेस काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकात हंडोरे, खासदार रजनी पाटील आदी उपस्थित होते.
केंद्र सरकार देशातील मोजक्या २०-२५ लोकांचे ऐकते, त्यांच्यासाठीच निर्णय घेते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, गरीब महिला, मजूर यांचे कर्ज माफ न करता अदानीचे १६ लाख करोडचे कर्ज माफ केले. हा शेतकरी गरीब, मजुरांवर अन्यायच आहे. देशात ५० टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. आदिवासी, दलित, शेतकरी, आजही विकासापासून वंचित आहे, याला विद्यमान केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम जाती गणना
काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम जाती गणना केली जाईल. त्यामुळे या देशात आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, किती आहे ते समजण्यास मदत होईल. याचबरोबर देशातील सर्व संस्थाचे आर्थिक सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणातून संस्थांमध्ये महिलांची भागीदारी किती आहे, ते समजण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.