नववर्षात आश्रमशाळा होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 10:32 PM2020-12-28T22:32:06+5:302020-12-28T22:32:25+5:30
जिल्हाधिकऱ्यांची परवानगी : कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा
धुळे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत पुढील महिन्यापासून नववी ते बारावीच्या वर्गाच्या निवासी शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सोमवारी दुपारी निवासी शाळा सुरू करण्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी मनीष पवार, समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आणि शारीरिक अंतर ठेवून निवासी शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग आणि आदिवासी विभागाने नियोजन करावे. ज्या शाळा सुरू करता येणार नाहीत, तेथे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळेल, असे नियोजन करावे. वर्ग खोल्या नियमितपणे स्वच्छ कराव्यात. वेळोवेळी सॅनेटायझरची फवारणी करून घ्यावी. तसेच आतापर्यंत सुरू केलेल्या शाळांना शिक्षण विभागाने वेळोवेळी भेट देत तेथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात असल्याची खात्री करावी. त्यासाठी पथकांची नियुक्ती करावी, असेही निर्देश देण्यात आले. शाळा सुरु करण्याच्या नियोजनाची माहिती देण्यात आली.
५६ आश्रमशाळा
धुळे जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत ५६ आश्रमशाळा असून त्यात २८ हजार २७१ विद्यार्थी आहेत. तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण अंतर्गत अनुसूचित जातीच्या दोन आणि विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळा आहेत.